सोलापुरात दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी गजाआड,चौघांना अटक , १ लाख ४० हजार रुपये, दोन दुचाकी, मोबाईल असा जवळपास २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
सोलापूर/एमएमसी न्यूज नेटवर्क- दुचाकीस्वारांना अडवून, त्यांना मारहाण करून लूटणारी टोळी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे.अरुण चंद्रकांत पडगे (वय २३, रा. लहान इराण्णा वस्ती, रामवाडी, सोलापूर), रितेश विठ्ठल जाधव, अभिषेक राजू गायकवाड (वय २१, दोघे रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर), रविकांत बसवराज हिरोळे (वय २०, कल्पना नगर, कोंडा नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सनी शिवका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२३ ऑगस्ट २०२३ रोजी अवंतीनगर (सोलापूर) येथील भारत फायनान्स या कंपनीचे फिल्ड ऑफिसर सनी गणेश शिवका, सिनीयर ऑफिसर प्रशांत सुरेंद्र कांबळे हे दोघं चिंचोळी एमआयडीसी परिसरात बचत गटातील महिलांना वाटप केलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसूल करून ते केगाव डेंटल कॉलेजमार्ग देशमुख पाटील वस्तीकडे जात होते. कॉलेजच्या पुढे काही अंतरावर तिघांनी त्यांना रस्त्यात अडवून, मारहाण करून त्यांच्याकडील पैशाची बॅग, मोबाईल, टॅब अशा वस्तू काढून घेत पळ काढला होता. गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या तपास पथकांनी घटनास्थळाला सहायक पोलीस निरिक्षक दादासाहेब मोरे यांनी त्यांच्या तपास पथकातील इम्रान जमादार, संदीप जावळे यांनी भेट देऊन पाहणी केली होती.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून रविवारी (दि. ३) एका लाल काळ्या रंगाची पल्सर व एक एचएफ डिलक्स अशा दोन दुचाकींवरून संभाजी तलाव परिसरात असलेल्या वनविहार या ठिकाणी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. .