डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी ऑक्टोबरमध्ये साताऱ्यात एकदिवसीय कार्यशाळा :एस.एम.देशमुख

सातारा /एम एन सी न्यूज नेटवर्क– डिजिटल मिडिया परिषदेच्यावतीने डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी एक दिवसाचे कार्यशाळा 8 ऑक्टोबर रोजी सातारा येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली..
एस.एम देशमुख यांनी आज सातारा येथे जिल्ह्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सदस्यांशी संवाद साधला.. आजच्या बैठकीस युट्यूब चॅनलचे 70 पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते.. सर्व प्रथम राज्य अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल एस.एम देशमुख यांचा आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हरिष पाटणे यांचा सातारा जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्यावतीने सत्कार करण्यात आला..

प्रारंभी देशमुख यांनी जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या पत्रकारांच्या भूमिका जाणून घेतल्या.. डिजिटल पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबीर घेण्याची सूचना अनेकांनी केल्यानंतर देशमुख यांनी लगेच ही सूचना मान्य करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सातारा येथे हे शिबीर घेण्याची घोषणा केली..कार्यशाळेसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करून युट्यूब चॅनल कसे सुरू करावे, ते प़भावी कसे चालवावे, गुगलकडून आर्थिक लाभ कसे मिळविता येतील यासह नवे टेक्निक देखील समजून सांगितले जाईल.. राज्यभरातून या कार्यशाळेसाठी 400 पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित राहतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.

देशमुख म्हणाले, डिजिटल मिडियाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.. डिजिटल मिडिया हे आजचे प्रभावी माध्यम आहे.. त्यामुळे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रमाणेच डिजिटल मिडियाला देखील शासन मान्यता मिळाली पाहिजे.. मध्य प्रदेश सरकारने ती दिली असून महाराष्ट्र सरकारने देखील डिजिटल मिडियाला मान्यता देत जाहिराती सुरू केल्या पाहिजेत.. त्याच बरोबर काही निकष ठरवून डिजिटल मिडिया पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी आणि या माध्यमाच्या प़तिनिधींना अधिस्वीकृती समितीवर देखील स्थान मिळावे यासाठी मराठी पत्रकार परिषद प्रयत्न करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. आजच्या या कार्यक्रमास सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी, डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सनी शिंदे, सुजीत आंबेकर, अरविंद मेहता, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, जीवनधर चव्हाण, तुषार भद्रे, पद्माकर सोळवंडे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते..