संस्कृत भाषेत विश्वात्मक नवनिर्मितीचे सामर्थ्य ! सामूहिक ‘संस्कृत दिन’ समारंभात प्रा. सोनेराव आचार्य यांचे प्रतिपादन

सामूहिक ‘संस्कृत दिन’ समारंभ

बीड/परळी वैजनाथ- एमएमसी न्यूज नेटवर्क–दि.६-मानवी मनाच्या विकृतींतून निर्माण झालेल्या भेदभावनांच्या भिंती तोडून एकसंध समाज उभारण्यासाठी दिव्य अमृतवाणी असलेल्या संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार होणे ही काळाची गरज आहे. कारण याच भाषेत विश्वात्मक नवनिर्मितीचे सामर्थ दडले आहे ,असे प्रतिपादन संस्कृत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. सोनेराव आचार्य यांनी केले.

येथील आर्य समाज सभागृहात संस्कृत भाषा प्रसार केंद्राच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या सामूहिक ‘संस्कृत दिन’ समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री उग्रसेन राठौर होते. यावेळी वैदिक विचारवंत आचार्य सानंदजी, गुरुकुलाचे प्रमुख आचार्य सत्येंद्रजी,संयोजक पं. प्रशांतकुमार शास्त्री, संस्थेचे अध्यक्ष जुगल किशोरजी लोहिया, पुरस्कारप्रदाते संज्योत जयपाल लाहोटी आदी उपस्थित होते.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्री आचार्य यांनी संस्कृत भाषेच्या गुणवैशिष्ट्यांवर ओघवत्या शैलीतून प्रकाश टाकला. ते म्हणाले – ‘मानव जीवन सर्वांगसुंदर, आनंदी, निरामय व ज्ञानयुक्त बनवायचे असेल तर संस्कृत भाषा शिकलीच पाहिजे. ही भाषा अवगत झाल्यास इतर भाषा शिकणे सोपे जाते. आपल्या डोक्यावर बसलेले पाश्चात्य संस्कृती व आग्लभाषेचे भूत दूर सारून शुद्ध, सोप्या, कर्णमधुर व सुरम्य असलेल्या या भाषेचे ज्ञानग्रहण केले पाहिजे.’

यावेळी आचार्य श्री सानंदजी यांनीही संस्कृत भाषेचे महत्त्व विशद केले. सुरुवातीला वैदिक मंत्रोद्घोषात विद्वानांनी दीप प्रज्वलन करून या संस्कृत दिन समारंभाचे उद्घाटन केले. तर विद्यार्थ्यांनी संस्कृतगीतिका सादर केल्या. संस्कृत दिनानिमित्त घेण्यात आलेल्या श्लोक पाठांतर व भाषण स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. श्लोकपाठान्तर स्पर्धेत विविध शाळा -महाविद्यालयांच्या एकूण २२७ तर संस्कृत भाषण स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या संस्कृतस्पर्धांच्या परीक्षकांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ‌.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .डॉ .नयनकुमार आचार्य यांनी, सूत्रसंचालन प्रा .डॉ. अरुण चव्हाण व सौ. पल्लवी फुलारी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. वीरेंद्र शास्त्री यांनी मानले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी सर्वश्री रंगनाथ तिवार, लक्ष्मण आर्य गुरुजी, उदय तिवार ,दयानंद शास्त्री, ओम कुमार कुरुडे, सोमेंद्र शास्त्री,अरविंद घोडके आदींनी प्रयत्न केले.