करवीर निवासिनी महालक्ष्मीचे पंकजाताई मुंडे यांनी घेतले दर्शन

सर्व सामान्य जनतेच्या सुखासाठी केली प्रार्थना ; खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक यांनी केलं स्वागत

कोल्हापूर/एम एन सी न्यूज नेटवर्क–दि. ०७ –शिव-शक्ती परिक्रमेच्या आजच्या चौथ्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सकाळी महालक्ष्मी अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. राज्यातील सर्व जनतेवर कोणतंही संकट येऊ देवू नको अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. खा. धैर्यशील माने पूर्णवेळ त्यांच्यासमवेत होते.

शिव-शक्ती परिक्रमा बुधवारी संध्याकाळी शहरात मुक्कामास होती. पंकजाताई मुंडे यांनी सकाळी ९ वा. साडे तीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देवीचे अतिशय मनमोहक व प्रसन्न रूप अंर्तमनात साठवून त्यांनी पुढील प्रवास सुरू केला. देवीच्या मुर्तीच्या वर प्रतिष्ठापित शिवलिंग आणि गणपतीचेही यावेळी दर्शन घेतले. मंदिराचे पुरातन आणि ऐतिहासिक महत्व तसेच वैशिष्टय़पूर्ण रचना याबद्दल मंदिर प्रशासनाने त्यांना माहिती दिली व सत्कार केला. मंदिराची प्रदक्षिणा करताना रांगेत उभ्या असलेल्या भाविक भक्तांमध्ये मिसळून त्यांनी संवाद साधला, त्यांचेसोबत सेल्फी काढण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. मंदिर परिसरातील दुकानात जाऊन त्यांनी काही वस्तुही खरेदी केल्या.

खा. धैर्यशील माने, खा. धनंजय महाडिक यांनी केलं स्वागत
खा. धैर्यशील माने सकाळी पंकजाताई मुंडे यांचेसोबत पूर्णवेळ होते. दर्शनानंतर त्यांनी पंकजाताईंचा निवासस्थानी सत्कार केला, दरम्यान काल संध्याकाळी कोल्हापूरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी परिक्रमेचं फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले त्यानंतर खा. धनंजय महाडिक यांनी त्यांचे निवासस्थानी स्वागत केले.