नागापूर वाण धरणावर सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात

जागरण-गोंधळ,भारुड – भजनाने वाणधरण दुमदुमले

बीड/ परळी वैजनाथ- एमएनसी न्यूज नेटवर्क– सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्ह्यातील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ परळी तालुक्यातील समाज बांधव पुढे येताना दिसत आहेत. तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत.गुरुवारी नागापूर येथील वाण धरणावर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सकाळी 11 वां सुरुवात झाली.या आंदोलनात आजूबाजूच्या गावातील नागरिक सहभागी झाले होते.प्रशासनाला 5 तारखेला या आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आलेले होते.

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नागपूर येथील वाण धरणावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.विशेष म्हणजे पाऊस असतानाही समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले.वाण धरणात असलेल्या खंडोबा मंदिर येथे हे आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनात पहिल्या दिवशी शेकडो समाजबांधवांनी सहभाग घेतला.आंदोलनात भजन,भारुडे जागरण गोंधळ घालत उपस्थितांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम केले.

राज्य सरकार ने सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, आंतरवली सराटी घटनेनंतर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत,घटनेस जवाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.आंदोलकांच्या अशा प्रमुख मागण्या असून आपल्या मागण्यावर आंदोलक ठाम आहेत.दरम्यान कुठलीही अनुचित घटना होणे म्हणून प्रशासन सतर्क असल्याचे दिसून आले.वाण धरणावर
पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवलेला दिसून आला.या ठिकाणी महिला व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले होते.
——————————————————————–
ना पावसाची तमा,ना वातावरणाची चिंता आंदोलनास सुरुवात झाली आणि पाऊस आला तरी आंदोलनकर्ते किंचितही विचलित झाले नाहीत. उलट पावसाचे स्वागत करत, घोषणा देत आंदोलन चालूच ठेवले.
——————————————————————–