कोकणात गणेशोत्सवासाठी धावणाऱ्या विशेष गाड्याच्या डब्याची संख्या वाढवावी

गौरी-गणेशोत्सव

रेल्वे प्रशासनाकडे  कोकण विकास समितीचीमागणी.
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाडी क्रमांक ०११५५/०११५६ दिवा-चिपळूण गाडी ८ डब्यांची तर ०११५३/ ०११५४ दिवा – रत्नागिरी गाडी १२ डब्यांची आहे.ठाणे, नवी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात जातात. मात्र त्यांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवताना मोठी कसरत करावी लागते. या धावणाऱ्या दोन गाड्यांना डब्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेकांना अनारक्षित तिकिटावर प्रवास करावा लागतो. एकूणच सणांच्या दिवसांत या गाड्यांना मोठी गर्दी असते. गर्दीच्या कालखंड असल्याने हा प्रवास धोकादायक आणि त्रासदायक ठरू शकतो. चाकरमान्यांच्या प्रवासासाठी रेल्वेद्वारे गणपती विशेष गाड्या सोडण्यात येतात. मध्य-पश्चिम रेल्वे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३१२ गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. यामुळे या दोन्ही गाड्या १६ डब्यांच्या चालवण्यात याव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दरवर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गणपती विशेष गाड्या चालविण्यात येतात. गेल्या वर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेने २९४ गणपती विशेष ट्रेन चालवल्या होत्या. त्यामध्ये यंदा
वाढ करून ही संख्या ३१२ करण्यात आली आहे. ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या २५७ आणि पश्चिम रेल्वेच्या ५५ गणपती विशेष गाड्यांचा समावेश आहे. यापैकी मात्र यावर्षी नागपूर मडगाव ही नेहमीची गाडी वगळता कल्याणमार्गे एकही गणपती विशेष गाडी सोडलेली नाही.त्यामुळे गणेश चतुर्थी आणि आधीचे तीन दिवस आणि गौरी विसर्जन व पुढचे तीन दिवस या कालावधीत दिवसाला नियमित गाड्या वगळता किमान १२ ते १५ जादा गाड्यांचे नियोजन करावे लागणार आहे.

कोकण मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत अलीकडेच खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीपूर्वी गाड्या दिव्याऐवजी दादरवरून सोडण्याची मागणी केली होती. तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते. मात्र या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. राजकीय नेत्यांच्या सूचनांना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केराची टोपली दाखवण्यात येत आहे. दरम्यान, या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.