शशी थरूर यांनी केलं मोदींचं कौतुक! काँग्रेसची टीका

G20 Summit:

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत दोन दिवसीय जी २० शिखर परिषद पार पडली असून या परिषदेतून काय साध्य झालं? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून परिषदेच्या निमित्ताने मोदींनी देशाला जागतिक पातळीवर मोठं स्थान मिळवून दिल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे विरोधकांकडून यासंदर्भात टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. मात्र, काँग्रेसकडून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात असलं, तरी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मात्र या परिषदेतून साध्य झालेल्या गोष्टींबद्दल मोदी सरकारवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शशी थरूर यांनी मोदी सरकारं कौतुक केलं आहे. “जी २० परिषदेतून आपण जे साध्य केलं आहे, ते नक्कीच भारतासाठी मोठं राजनैतिक यश म्हणावं लागेल. कारण हे सर्व नेते भारतात येईपर्यंत याचीच शंका होती की त्यांचं संयुक्त निवेदन तरी निघू शकेल की नाही. रशिया-युक्रेन युद्धाचं समर्थन करणारे व विरोध करणाऱ्यांमध्ये एकमत होणं निव्वळ अशक्य वाटत होतं. पण या मुद्द्यावर गेल्या ९ महिन्यांत अशक्य वाटणारा फॉर्म्युला प्रत्यक्षात मंजूर करून घेण्यात सरकारला यश आलं आहे. हे भारताचं यश म्हणता येईल”, असं शशी थरूर म्हणाले.

या परिषदेसाठी विरोधी पक्षांना आमंत्रण न दिल्याचा मुद्दा शशी थरूर यांनी या मुलाखतीत उपस्थित केला. “विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षातील खासदार, वेगवेगळ्या समित्यांमधील विरोधी पक्षांचे सदस्य यापैकी कुणालाच परिषदेतील कोणत्याच कार्यक्रमाचं आमंत्रण नव्हतं. त्यामुळे परिषदेत राजनैतिक पातळीवर जी सर्वसमावेशकता दिसली, ती आपल्या अंतर्गत राजकीय पातळीवर मात्र दिसून आली नाही”, अशा शब्दांत शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली.