मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 

Manoj Jarange Maratha Protest Jalna मराठा आरक्षण

जालना/एम एन सी न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील अंतरावली सराटे या गावात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं मराठा आरक्षणासाठीच उपोषण तब्बल 17 दिवसांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सोडण्यात आलं. उपोषण सोडले असले तरी साखळी उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली. यावेळी मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री आणि शिष्टमंडळ उपस्थित होते. अंतरावली सराटे गावात गेल्या १७ दिवसांपासून चालू असलेलं मनोज जरांगे पाटील यांचं बेमुदत उपोषण अखेर मागे घेण्यात आलं. राज्य सरकारकडून शिष्टमंडळानं आधीच मनोज जरांगे पाटलांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा केली होती. शेवटी मराठा आरक्षणासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी देण्याचंही मनोज जरांगे पाटलांनी मान्य केलं. मात्र, स्वत: मुख्यमंत्री भेटायला आल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. अखेर आज मुख्यमंत्र्यांनी सराटी गावात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याच हस्ते सरबत पिऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांशी चर्चा करून त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. माध्यमांशी बोलताना राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याच्या भूमिकेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुनरुच्चार केला. “मराठा आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीयही आंदोलनस्थळी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटलांच्या वडिलांनाही एकनाथ शिंदे यांनी ज्यूस प्यायला दिला.