बिहारमध्ये शाळकरी मुलांनी भरलेली बोट उलटली; १४ विद्यार्थी बेपत्ता‍

या बोटीत नेमकी किती मुलं होते याबाबत संभ्रमावस्था आहे, १४ विद्यार्थी बेपत्ता‍

बिहार/पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे मुलांना शाळेत घेऊन जाणारी बोट उलटली आहे. या दुर्घटनेत १४ मुले बेपत्ता आहेत. बोटीवर तीसहून अधिक मुले होती. एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले आहे.

वरील दुर्घटना गायघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मधुरपट्टी घाटाजवळ बोटीचा अपघात झाला. भटगामा मधुरपट्टी येथील पीपळ घाटातून बागमती नदीतून मुले शाळेत जात होती. त्याचवेळी बोट उलटली. अपघातानंतर स्थानिक मच्छीमारांनी मुलांना वाचवण्यासाठी तेथे धाव घेतली. त्यांनी अनेक मुलांना बाहेर काढले, पण अजूनही अनेक मुले बेपत्ता आहेत. घटनेनंतर त्या भागात एकच गोंधळ उडाला. त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली होती.
या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनेनंतर तासाभराने पोलीस घटनास्थळी पोहोचले. बचावकार्यासाठी बचाव पथकही वेळेवर पोहोचले नाही. नदीत मुले बेपत्ता आहेत. नदीवर पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून सरकारकडे केली जात आहे, मात्र, त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या घटनेबाबत माजी डीएसपी सहरियार अख्तर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुरपट्टी घाटाजवळ बोटीचा अपघात झाला. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त मुले आणि महिला होत्या. अपघातानंतर काही मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बोटीत किती मुले होती या बाबत संभ्रमावस्था आहे.