मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात ३९ ठिकाणी छापे, याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रुपयांची रोख रक्कम आणि १३ कोटी रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत.
मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स महादेव ऑनलाइन बुक बेटिंग ॲप संबंधित प्रकरणात कोलकाता, भोपाळ व मुंबई येथील ३९ ठिकाणी छापे टाकले असून याप्रकरणी सुमारे ४१७ कोटी रुपये किंमतीची मालमत्ता गोठवण्यात अथवा जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. या कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे यूएईमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गंभीर बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात सादरीकरण करण्यासाठी १४ चित्रपट कलाकार व गायकांनी हवालामार्फत रक्कम घेतली होती.
ईडीने याप्रकरणी मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापे टाकले आहेत. ईडीने महादेव ऑनलाईन बेटींग ॲपशी सबंधित ठिकाणी छापे टाकले असून त्यात मुंबईसह भोपाळ, कोलकाता परिसरातील ठिकाणांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील रहिवासी असलेले रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ॲपचे प्रवर्तक असून या कारवाईमध्ये तब्बल ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक टीव्ही आणि सिरीयल कलाकार मंडळींनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. संशयीत कलाकारांनी हवालामार्फत पैसे स्वीकारल्याचा संशय आहे. त्यांना याबाबत माहिती होती का याची पडताळणी करण्यासाठी यापैकी अनेकांवर ईडी लवकरच समन्य बजावणार आहे. योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रैकेट चालवले जात असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.
