🔷 भक्तीमय, उत्साही वातावरणात झाला श्रीकृष्ण जन्मोत्सव, सुर्यभान नाना मुंडे यांनी कुटुंबियांसह घेतला फुगडीचा आनंद
बीड/परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क- नामस्मरणामध्ये भगवंताला प्राप्त करण्याची शक्ती आहे. त्यामुळे आपण कुणाची निंदा, नालस्ती करण्यामध्ये किंवा उणेदूणे काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा भगवंताचे नामस्मरण करून देवाशी नाते जोडावे असे आवाहन प्रख्यात भागवतकार ह. भ. प. देवी वैभवीश्रीजी यांनी आज तळेगाव येथील भागवत कथेच्या चौथ्या दिवसाचे पुष्प गुंफताना केले तर ज्यांच्या पोटी चांगली संतती जन्म घेते ते माता पिता भाग्यवान असतात असे प्रतिपादन ज्ञानेशभक्त ह. भ. प. अर्जुन महाराज लाड गुरूजी यांनी किर्तन सेवेत केले. दरम्यान आज श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे वर्णन असल्याने उत्साह ओसंडून वाहत होता. उपस्थितांनी मनमोहून टाकणार्या भक्तीगितांवर नृत्य केले. मुख्य संयोजक सुर्यभान नाना मुंडे यांनीही आपल्या कुटुंबियांसह फुगडीचा आनंद घेतला. आज पोळा सण असुनही कथेला महिला – पुरूषांची प्रचंड उपस्थिती होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुर्यभान नाना मुंडे यांनी कै. हनुमंतराव मुंडे (बापू) यांच्या स्मरणार्थ तळेगाव येथे श्रीमद भागवत कथा आणि किर्तन महोत्सवाचे आयोजन केले असुन पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा संख्येने याचा लाभ घेत आहेत. देवी वैभवीश्रीजी म्हणाल्या की, आजकाल महिलांनी एकमेकींची निंदा आणि गार्हाणी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मुलांवर चांगले संस्कार केले तर क्रांती घडेल. नको त्या गोष्टीमध्ये वेळ जात असल्याने समाज विनाशाकडे जात आहे. म्हणून प्रत्येकाने चांगले वागण्याची स्वतःपासून सुरूवात करावी असे आवाहन त्यांनी केले.
भक्तांच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांना आवतार घ्यावा लागला. भगवंतांना आवतार का घ्यावा लागला याविषयी त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले. यावेळी देवी वैभवीश्रीजी यांनी अनेक प्रसंग रंजक पद्धतीने सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी श्रवणीय आवाजामध्ये भजनेही सादर केली. भागवत कथेला दिवसेंदिवस उपस्थिती वाढत चालली आहे. तळेगावच्या जवळपास असलेल्या गावातुनही भाविक मोठय़ा संख्येने उपस्थिती लावित आहेत.
सुर्यभान नाना मुंडे यांनी कुटुंबियांसह घेतला फुगडीचा आनंद
आज श्रीमद भागवत कथेच्या चौथ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण जन्माची कथा झाली. हा जन्मोत्सव भाविकांनी भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. मंडपात उपस्थित असलेल्या अबाल – वृध्दांनी भजनावर नृत्य केले. उपस्थित महिला – पुरूषांनी आनंदोत्सव साजरा करतांना फुगडीही खेळले. मुख्य संयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुर्यभान नाना मुंडे, सौ. चंद्रकलाबाई मुंडे यांनी आपल्या कुटुंबियांसह फुगडीचा आनंद घेतला. यात सरपंच प्रदीप मुंडे, कृष्णा मुंडे यांच्यासह सर्वांनी यात सहभाग घेतला.
🔸 चांगली संतती लाभण्यासाठी भाग्य लागते – ह. भ. प. अर्जुन महाराज लाड
कै. हनुमंतराव मुंडे (बापू) यांच्या वर्षश्राध्दाच्या निमित्ताने तळेगाव येथे सुरू असलेल्या किर्तन महोत्सवात बुधवारी रात्री ज्ञानेशभक्त ह. भ. प. अर्जुन महाराज लाड गुरूजी यांनी किर्तन सेवा केली. “कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हारीक वाटे जीवा” या अभंगाची अतिशय अभ्यासपूर्ण सोडवणूक केली. ते म्हणाले, पोटी चांगली संतती येण्यासाठी माता – पित्याची पुण्याई असावी लागते. कै. हनुमंतराव मुंडे हे सज्जन वारकरी होते म्हणुनच त्यांच्या पोटी सुर्यभान नाना आणि त्यांच्या भावंडांसारखी रत्ने जन्माली आली असा गौरव त्यांनी केला. पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आदर्श पिढी निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज उमेश महाराज दशरथे यांचे किर्तन
कै. हनुमंतराव मुंडे (बापू) यांच्या वर्षश्राध्दाच्या निमित्ताने तळेगाव येथे सुरू असलेल्या किर्तन महोत्सवात उद्या शुक्रवार दि. 15 रोजी रात्रौ 9 ते 11 या वेळेत ह. भ. प. उमेश महाराज दशरथे (मानवतकर) यांचे किर्तन होणार आहे. तळेगाव येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा आणि किर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आवाहन रूक्षराज आबा मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुर्यभान (नाना) मुंडे, सुभाष अप्पा मुंडे यांनी केले आहे.