‘रवी परांजपे फाउंडेशन’ चा २०२३ चा ‘गुणिजन कला पुरस्कार’ जाहीर.

🔷 चित्रकार चारुहास पंडित आणि चित्रकार चिंतामणी हसबनीस या दोन कलाकारांच्या कार्याचा सन्मान.

🔷 दोन्ही कलाकारांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन ‘द रवी परांजपे स्टुडिओ’, मॉडेल कॉलनी येथे ८ ते १५ ऑक्टोबर २०२३ पर्यन्त रसिकांसाठी खुले.

पुणे- रवी परांजपे फाउंडेशन चा वार्षिक गुणिजन कला पुरस्कार, कला क्षेत्रात भरीव कामगिरी करत सामाजिक उन्नतीलाही हातभार लावणाऱ्या कलाकाराचा गौरव करण्यासाठी दिला जातो. या वर्षी चित्रकार श्री. चारुहास पंडित आणि चित्रकार चिंतामणी हसबनीस या दोन कलाकारांच्या कार्याचा सन्मान या पुरस्काराने होतो आहे.

श्री. चारूहास पंडित हे तीस वर्षाहून अधिक वर्ष कार्यरत असलेले उत्कृष्ट पैलूदार चित्रकार आहेतच पण त्यांनी मराठी भाषेत अजरामर केलेल्या ‘चिंटू’ या व्यंगचित्रमालिकेमुळे त्यांचं नाव घरा घरात पोचलं. तसंच लाकडाच्या तुकड्यांचे नैसर्गिक रंग अबाधित ठेवत केलेली ‘काष्ठ चित्र निर्मिती’ हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

श्री. चिंतामणी हसबनीस हे उत्कृष्ट चित्रकार आणि रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध आहेत. दृष्टीहीनांना दिलेल्या ‘कलास्वादाच्या दृष्टी’ मुळे त्यांचं कलाक्षेत्रातलं योगदान अनोखं आणि अमूल्य आहे. दृष्य चित्रांना ब्रेल लिपीची, आणि अभिवाचनाची जोड देत चित्र ‘पाहण्यातला’ आनंद दृष्टिहीन किंवा कमकुवत दृष्टी असलेल्या व्यक्तीपर्यंत पोचवायचं अशक्यप्राय वाटणारं कार्य ते करत आहेत.

पुरस्कार वितरणाचा समारंभ फर्ग्युसन कॉलेज रोड पुणे येथे ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’ च्या सभागृहात ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होईल. त्यानंतर दोन्ही कलाकारांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन ‘द रवी परांजपे स्टुडिओ’, मॉडेल कॉलनी येथे ८ ते १५ ऑक्टोबर २०२३ पर्यन्त रसिकांसाठी खुले राहील.

अधिक माहिती facebook.com/artistraviparanjape आणि raviparanjape.org येथे उपलब्ध होईल.