सणासुदीच्या काळात प्रवासी वाऱ्यावर! खासगी बसच्या भाड्यावर नावालाच नियंत्रण

संग्रहित छायाचित्र

विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक, आरटीओकडून केवळ काही बसवर दिखाऊ कारवाईचे चित्र. ई-मेल rto.12-mh@gov.in येथेही प्रवासी  तक्रार पाठवू शकतात.

पुणे: गौरी आणि गणपती सणासाठी मुंबई आणि पुण्यातुन अधिकच्या संख्येने विदर्भ आणि मराठवाड्यात,कोकण येणाऱ्या नोकरीच्या निमित्ताने गेलेल्याची संख्या मोठी आहे. सणासुदीच्या काळात नेहमीच खाजगी बस वाहतूकदार गावाकडे परतणाऱ्या प्रवासी नागरिकांची लूट करत असतात, अधिक भाडे वसूल केले जाते अशा तक्रारी नागरिक करत असतात परंतु आरटीओ विभाग याच्यावर कुठलीच कारवाई करत नसल्याचे दिसून येत. त्यामुळे यंदा तरी सणानिमित्त कोकण,विदर्भ आणि मराठवाड्यात परतणाऱ्या प्रवाशांची लूट थांबावी अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. गणेशोत्सवासाठी शहरातून मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन खासगी प्रवासी बस कंपन्यांनी प्रवाशांची लूट करू नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचे पाऊल उचलले. मात्र, आरटीओकडून कारवाईचे प्रमाण नगण्य असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांची संख्या वाढल्याने बसचे भाडे वाढविण्याचे प्रकार केले जातात.काही खासगी प्रवासी बस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारतात.पुण्यातुन-मुंबईहून दररोज सुमारे पाचशेहून अधिक खासगी बस महाराष्ट्राच्या विविध भागांत जातात. हे रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने खासगी बस कंपन्यांना तंबी दिली होती. प्रत्यक्षात मात्र, आरटीओकडून आतापर्यंत फारशी कारवाई झालेली नाही. केवळ काही बसवर दिखाऊ कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे.

खासगी प्रवासी बसने एसटी बसच्या प्रति किलोमीटर भाडे दराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाडे आकारल्यास तक्रार नोंदवावी, असे आवाहन आरटीओने केले आहे. जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी बस मालक-चालक यांनी नियमानुसार प्रवासी तिकीटदराची आकारणी करावी, असेही आरटीओने म्हटले आहे.