७००१ श्रीफळ वापरून बनवलेल्या श्रींची आज स्थापना

कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांची असणार उपस्थिती; नाथ प्रतिष्ठान व राधा – मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित नवरात्र मंडप देखाव्याच्या उभारणीचाही शुभारंभ
🔷 दैनिक मराठवाडा साथी, राधा – मोहन साथी प्रतिष्ठानचा उपक्रम

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क-  मराठवाडा साथी व राधा – मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव २०२३ अंतर्गत मंगळवार दि.१९ सप्टेंबर रोजी श्रींच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. तर दुपारी १.०० वाजता राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते नाथ प्रतिष्ठान व राधा – मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या मंडप देखाव्याची नवरात्र उत्सव प्रसंगी उभारणीचा शुभारंभ करण्यात येत आहे. या कार्यक्रम प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

दैनिक मराठवाडा साथी व राधा – मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या गणेशोत्सवात ७००१ श्रीफळ वापरून भव्य गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. शुक्रवार, दि.१९ सप्टेंबर रोजी या मूर्तीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. तर राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे हे गणेशोत्सवात भेट देणार असून त्यांच्या शुभहस्ते नाथ प्रतिष्ठान व राधा – मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित  आई तुळजा भवानीच्या भव्य देखावा मंडप उभारणीची पायाभरणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

भव्य ऑनलाईन राज्यस्तरीय देखावा स्पर्धा
दैनिक मराठवाडा साथी, राजस्थानी मल्टीस्टेट आणि राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये अधिकारी, सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी यांच्या मुलाखती व विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षी राज्यस्तरीय ऑनलाईन गणेश व महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी स्पर्धक विजेत्यांना सार्वजनिक गणेश मंडळांसाठी प्रथम बक्षीस ११००१ रुपये, द्वितीय बक्षीस  ७००१ रुपये, तृतीय बक्षीस ३००१ रुपये याप्रमाणे तर महालक्ष्मी व घरगुती गणेश स्पर्धासाठी स्वतंत्र बक्षिसे प्रथम बक्षीस ५००१ रुपये, द्वितीय बक्षीस ३००१ रुपये, तृतीय बक्षीस २००१ रुपये याप्रमाणे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक तथा मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.