
गणराया, सुखकर्ता आणि दुखहर्ता होऊन शेतकरी बळीराजावरील संकट दूर कर धनंजय मुंडेंचे बप्पाकडे साकडे!
जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडे यांनी सपत्निक पूजन करून केली श्रींची स्थापना.
बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- दि. 19)- श्री गणराया हे सुखकर्ता व दुःखहर्ता आहेत. आज सर्वत्र श्री गणेशाचे अत्यंत उत्साहात आगमन झाले. मात्र नैसर्गिक संकटामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये माझा शेतकरी बळीराजा मात्र संकटात आहे. त्यामुळे हे गणराया तुम्ही सुखकर्ता व दुःखहर्ता होऊन माझ्या शेतकरी बळीराजावरील संकट दूर करा, असे साकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गणपती बप्पाच्या चरणी घातले आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी वैद्यनाथ येथील पंढरी या निवासस्थानी आज बप्पा विराजमान झाले. धनंजय मुंडे यांनी पत्नी सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे यांच्यासह श्रींचे विधिवत पूजन करून स्थापना केली. यावेळी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणी बाई मुंडे व मुंडे कुटुंबीय उपस्थित होते. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण तर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव हा महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर सबंध देशभरात चर्चिला जाणारा गणेशोत्सव आहे. या गणेशोत्सवाद्वारे परळीकरांसाठी मोठमोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दरवर्षी आणली जाते.
मात्र यावर्षी उद्भवलेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता शेतकरी संकटात असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ गणेश महोत्सव रद्द करून नाथ प्रतिष्ठाणच्या श्री गणेशाचे त्यांच्या जगमित्र या संपर्क कार्यालया पद्धतीने स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रथेप्रमाणे सपत्रिक विधिवत पूजन करून श्री गणेशाची जगमित्र कार्यालयात स्थापना करण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांसह राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, शिवाजी सिरसाट, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रामेश्वर मुंडे, सुनीलनाना फड, सुरेश टाक, माणिकभाऊ फड, माऊली तात्या गडदे, नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, तुळशीराम पवार, युवक तालुकाध्यक्ष गोविंद कराड, नाथ प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष शंकर कापसे, वैजनाथराव बागवाले, ऍड. मनजीत सुगरे, अमित केंद्रे, संदीप दिवटे यांसह आदी उपस्थित होते.

