गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन- सौ अनिता संजय कुकडे यांचा इशारा

बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरा मध्ये दिवसभरात अनेक वेळा वीज गायब होत असून हा विजेचा लपंडाव होऊ नये, याची काळजी वीज वितरण कंपनीने द्यावी अन्यथा नागरिक व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मा उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेविका सौ अनिता संजय कुकडे यांनी दिला आहे.
हिंदू धर्मियांमध्ये  गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी-गणपती सणाच्या काळात विजेचा लपंडाव होऊ नये अशी गौरी व गणेश भक्तांची भावना असते. वीज गेल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे वीज वितरण कंपनीने विजेचा लपंडाव होऊ नये यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे सणासुदीत वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा  परळी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा सौ अनिता कुकडे यांनी दिला आहे.
परळी शहरामध्ये सध्या वारंवार वीज पुरवठा कोणत्याही पध्दतीचे भारनियमन नसताना कोणतीही पूर्वसूचना न देता, नेहमीच वीज पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. शहरातील छोटया-मोठया व्यवसायिकांचे खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळीही अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्या मुळे नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ येत आहे. रिमझिम पाऊस सुरू झाला की वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अशा ढिसाळ कारभारामुळे व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून किमान गौरी गणपती सणाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेविका सौ अनिता संजय कुकडे यांनी दिला आहे.