संशोधनातून तयार केलेल्या जैविक पावडरमुळे शेतीला दोन महिने पाण्याची गरज लागणार नाही

🔷 शेतकरी पुत्राची कमाल, पेटंट नोंद, कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून दखल.

🔷 कृषी विद्यापीठाची टीम जाणार पाहणी करायला, हा प्रयोग यशस्वी झाल्यास कृषी क्षेत्रात क्रांती होईल – धनंजय मुंडे

जळगाव /दि. 24 – जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असे संशोधन करून एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली असून ही जैविक पावडर पेरणीच्या वेळी बियाण्यासोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही असा दावा इंजिनीयर सुनील पवार यांनी केला आहे या पावडरचे पेटंट देखील सुनील पवार यांनी नोंद केले आहे.

सुनील पवार यांच्या या संशोधनाची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत सुनील पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली कृषी विद्यापीठातील तज्ञांची एक टीम पुढील आठवड्यात सुनील पवार यांनी संशोधन केलेल्या या पावडरचा व त्यांनी वापर केलेल्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहे या टीमचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

मका व अनेक दिवस पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या अन्य काही जैविक घटकांना एकत्र करून ही जैविक पावडर बनवण्यात आली असून दीड ते दोन महिने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या जैविक पावडर मध्ये आहे. त्यामुळे कमी पावसाच्या किंवा दुष्काळी भागात ही पावडर शेतीला वरदान देणारी ठरणार असल्याचा दावा सुनील पवार यांनी केला आहे.

पेरणी पासून ते पिकांना पाणी देण्याच्या काळात देखील सुनील पवार यांनी संशोधन केलेली जैविक पावडर दीड ते दोन महिने पाणी नसले तरी पिकांना जगवु शकते; हा प्रयोग पूर्णपणे जर यशस्वी झाला तर शेती क्षेत्रात क्रांती घडवणारा हा निर्णय ठरेल, तसेच दुष्काळी व अवर्षण ग्रस्त भागात देखील ही पावडर एक प्रकारचे वरदान ठरणार आहे. म्हणूनच चाळीसगाव जि.धुळे येथे आम्ही लवकरच कृषी विद्यापीठाच्या तज्ञांची एक टीम सुनील पवार यांच्या भेटीला पाठवत आहोत. या टीमचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.