तुळजभवानीच्या मंदिराचा हुबेहूब सजीव देखावा ठरणार आकर्षण

नाथ प्रतिष्ठान व राधा – मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित दुर्गोत्सव २०२३
बीड/ परळी वैजनाथ-एम एन सी न्यूज नेटवर्क  -कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेले नाथ प्रतिष्ठान व राधा – मोहन साथी प्रतिष्ठान दरवर्षी दुर्गोत्सव थाटात साजरा करण्यात येतो. यंदा आयोजित दुर्गोत्सव २०२३ मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानीची हुबेहुब मूर्तीची प्रतिकृती स्थापन करण्यात येत आहे. अतिशय भव्य असा हा देखावा असणार आहे. ज्यामध्ये तटबंदी किल्ल्याची प्रतिकृती असणार आहे. व त्याबरोबरच दैनंदिन पूजाअर्चा ज्याप्रमाणे तुळजापूर येथील मंदिरात होते त्याप्रमाणे सर्व पूजा इथेही दैनंदिन होतील. संबळ, पोतराज, परडी, मशालीची पोत अशा प्रकारे तुळजापूर येथील मंदिर प्रमाणे सजीव देखावा भव्य स्वरूपात उभारण्यात येणार आहे. २५ बाय ४० चा नवरात्री अखंड ज्योती कक्षाची निर्मिती करण्यात येणार असून २११ अखंड ज्योती अहोरात्र ९ दिवस विविध याजमनानंकडून स्थापित केल्या जातील.
नाथ प्रतिष्ठान व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. नाथ रोडवरील औद्योगिक वसाहत सभागृह येथे तुळजभवानीच्या मंदिराचा भव्य देखावा राकेश चांडक यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत आहे. दि.१५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता देवीची स्थापना करण्यात येणार आहे. गतवर्षी केलेला वैष्णव देवीचा देखावा संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण ठरला होता. वैष्णोदेवी येथून अखंड ज्योत आणण्यात आली होती. त्याचप्रमाणे यंदा तुळजापूर येथून ज्योत आणण्यात येणार असून ती देवी योगेश्वरीचे दर्शन घेऊन अंबाजोगाई येथून पायी ज्योत आणण्यात येणार आहे. रामरक्षा गौशाला येथे ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.तसेच परळी शहरात ज्योतीचे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पद्मनाभ स्वामींची भव्य मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य मार्गदर्शक चंदुलाल बियाणी यांनी दिली.
मध्यप्रदेश येथील बम्ब्लेश्वरी देवी मंदिरात ज्याप्रमाणे अखंड ज्योती असतात, त्याप्रमाणे २११ ज्योती स्थापित केल्या जातील. ११०० रुपयांची पावती घेऊन याचे यजमानपद भाविकांना घेता येईल. त्याचबरोबर देखावा पाहण्यासाठी सर्वसाधारण २० रुपये आणि व्हीआयपी दर्शन पास ५० रुपयांत उपलब्ध असतील. देखावा ठिकाणी फुल, फळ आणि प्रसादाचे दुकानही असतील. गाभाऱ्यात गोंधळी, आराधी, परड्या, संभळ अस सर्वकाही असेल अशी माहिती संयोजकांनी दिली.