न्यायालयाच्या आदेशाचा अवमान, शासनाचा विश्वासघात केल्याचा उत्कर्ष गुट्टेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश.

सध्या उत्कर्ष गुट्टे अंबाजोगाई नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत.

बीड/एम एन सी न्यूज नेटवर्क : बीड नगरपालिकेत वादग्रस्त ठरलेल्या आणि सध्या अंबाजोगाई नगरपालिकेत कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे याच्यावर न्यायालयाचा अवमान आणि शासनाचा विश्वासघात केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

बीड नगर पालिकेतील भ्रष्ट कारभार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. ज्या प्रकरणात दिवाणी न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश पारित केले, त्या प्रकरणात उत्कर्ष गुट्टे यांनी तात्पुरत्या लेआऊट साठी मंजुरी दिली, तसेच विकास शुल्क भरून घेतले. आता या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी बीड उत्कर्ष गुट्टे यांच्यासह तत्कालीन नगररचनाकार अनवरोद्दीन फैज अन्सारी, तत्कालीन सहायक नगररचनाकार आशुतोष कावलकर यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आणि शासनाचा विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे आवर सचिव दत्तात्रय कदम यांनी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत.