दर्शन करून परतताना काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर बारा जणांचा अपघाती मृत्यू

🔷 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गवर वैजापूर- जांबरगाव शिवारात अपघात,

🔷 सहा महिन्यापेक्षा लहान बाळाचा ही मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: नाशिक येथील काही भाविक बुलढाणा येथील सैलानी बाबाचे दर्शन करून नाशिककडे परतत असणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये चार महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे. तसंच अपघातात २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात बसच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. समृद्धी महामार्गा वर सातत्याने मानवी चुकामुळेच अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान नाशिक येथील काही भाविक बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी खासगी ट्रॅव्हल्स बस करून गेले होते. सर्व प्रवासी बुलढाण्याकडून नाशिककडे जात असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गवर वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवलं होतं. ट्रक चालक वाहन बाजूला घेत असताना पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जोराची आदळली. समृद्धी महामार्गा वर सातत्याने मानवी चुकामुळेच अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे वाहनांची गतीही बेफाम वाढली आहे, पण आपल्याला आपलं वाहन ताब्यात राहावं एवढीच माफक गती असायला हवी असं जाणकारांचं मत आहे. कंट्रोल होईल तेवढ्याच वेगाने वाहन चालवायचं भान आता वाहन चालकांनाही राहत नसल्याचे दिसत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने तात्काळ मदतकार्य सुरू केलं असून घटनास्थळावरून जखमी रुग्णांना तात्काळ स्थानिक रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.