वाचन संस्कृती वाढली पाहिजे यासाठीच प्रेरणा वाचनालयास पुस्तके भेट देणार- मुख्य अभियंता डॉ.अनिल काठोये
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क-14 ऑक्टोबर 1956 साली ऐतिहासिक दीक्षाभूमी नागपूर येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि खऱ्या अर्थाने सन्मान व स्वाभिमानाने जगणे शिकवलं असे प्रतिपादन बीड येथील पु.भिक्खु धम्मशील यांनी थर्मल कॉलनी येथे 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. सर्वांनी ती जोपासली पाहिजे. या साठीच प्रेरणा सार्वजनिक वाचनालयास पुस्तके भेट देण्यात येणार असल्याचं प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये यांनी केले.
शहरातील परळी औष्णिक विद्युत केंद्रातील शक्तीकुंज वसाहत येथे प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये तर प्रमुख पाहुणे म्हणून पु .भिक्खु धम्मशील, उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार ,अधीक्षक अभियंता एस.एन. बुकतारे, आदींची विचार मंचावर उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या क्रांतीच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांना वंदन केले जाते.हजारो वर्षांच्या अन्याय-अत्याचाराचा बदला घेण्याचा दृष्ट हेतूने डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. धम्माच्या माध्यमातून देशातील जनतेत बंधुता, मैत्री भावना रुजविण्याचाच त्यांचा विशाल दृष्टिकोन होता. भारत देश आणि भारतीय संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी भारतीय संस्कृती संवर्धित असलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपले राष्ट्रप्रेम सिद्ध केले. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतराला राष्ट्रहिताचीच किनार लाभलेली आहे, हे स्पष्ट होते.
धर्मांतरामुळे माणसा-माणसातील जातीची बंधने आणि जातीयत्व शिथिल झाले. परिणामी इतर धर्मातील लोकांवरही त्याचा हळूहळू प्रभाव पडत आहे. अशाप्रकारे डॉ. आंबेडकरांचे धम्मक्रांतीचे चक्र गतिमान होत आहे.असे प्रतिपादन मुख्य अभियंता डॉ.अनिल कोठाये यांनी केले.
या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता प्रशांत वंजारी,कार्यकारी अभियंता आर. एस. कांबळे,कार्यकारी अभियंता पी.एम.मगरे, कामगार नेते बी.एल. वडमारे, राहुल वाकळे, संचालक अनंत रोडे, महादेव वंजारे, प्रीतम हनुमंते, आकाश वाघ, भागवत देवकर, पत्रकार भगवान साकसमुद्रे,बिपिन कांबळे, संदिप सरवदे,यु.पी. पाटोळे आदीसह असंख्य अधिकारी ,कर्मचारी व थर्मल कॉलनीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभारी सहाय्यक कल्याण अधिकारी महेंद्र शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार जयवर्धन सूर्यवंशी यांनी मानले.