परळीत एकाचा निर्घृण खून, शहरात खळबळ

बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क – गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एका पिग्मी एजन्टचा खून करण्यात आल्याची घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह वनविभाग कार्यालयाच्या समोरील मोकळ्या मैदानात रविवार दि. 22 रोजी सकाळी आढळून आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान सदरील खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत परळी शहर पोलीस सुत्राकडुन प्राप्त माहिती अशी की, महादेव मुंडे (रा. भोपळा, तालुका परळी वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून परळीच्या बँक कॉलनी येथे रहावयास होते. रविवारी सकाळी महादेव मुंडे यांचा मृतदेह येथील तहसिल कार्यालयसमोरील जागेत आढलून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस चोरमले, परळी शहर पोलीस निरीक्षक रवी सानप, सपोनी दहिफळे, पोलीस उपनिरीक्षक नरहरी नागरगोजे, व इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मताचे भाऊ अशोक दत्तात्रय मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुर नं 191/2023 कलम 302 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरहरी नागरगोजे हे करीत आहेत.