बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- शहरातील ज्येष्ठ नागरिक व जुन्या पिढीतील वृत्तपत्र विक्रेते नागनाथ अप्पा गंगाधरअप्पा मुरुडकर [मोडीवाले] यांचे सोमवारी सकाळी ७ वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी सर्वाधिक १०३ वर्षांचे आयुष्य प्राप्त केले होते. श्री मुरुडकर हे वृत्तपत्र व्यवसाय क्षेत्रातील श्री दत्ता मुरुडकर यांचे वडील होते. त्यांच्यामागे मुलगा, सून, नातू नाही असा परिवार आहे.
मूळचे घाटनांदूर येथील रहिवासी असलेले श्री मुरुडकर यांनी सुरुवातीला आपल्या गावात शेतीसोबतच किराणा व्यवसायात काम केले. नंतर हे ४४ वर्षांपूर्वी परळीला आले व त्यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य सुरू केले. अतिशय कष्टाळू. काटक, सुस्वभावी व धार्मिक असलेले श्री मुरुडकर यांची जुन्या पिढीतील कर्मनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख होती. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक प्रामाणिक व्यक्तिमत्व जगातून निघून गेल्याने सर्वस्तरातून दुःख व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर वैद्यनाथ मंदिर मंदिरालगतच्या वीरशैव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक व वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.