गोवा/ पणजी : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना स्वतः वाहन चालवत गोवा पाहता यावा या हेतूने पूर्वी गोव्यात रेंटवर बाईक आणि कार मिळत असे. मध्यंतरीच्या काही काळात गोव्यात येणारे पर्यटक रेंटच्या बाईक वर अनेक ठिकाणी धिंगामस्ती करताना दिसून आले आहेत.दरम्यान अश्या बाईक किंवा रेंट अ कार चालविणाऱ्या व्यक्तीने केलेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला, तर यापुढे संबंधित चालकासह रेंट अ बाईक किंवा रेंट अ कारच्या मालकालाही तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
नुकताच पणजी मध्ये कदंब महामंडळाच्या ४३ व्या वर्धापदिन निमित्ताने आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार तथा महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांत रेंट अ बाईक चालवणाऱ्या पर्यटकांच्या धिंगाण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. असे चालक अपघात करून पळून जातात. बऱ्याचदा योग्य कागदपत्रे न घेताच मालकांकडून त्यांना बाईक किंवा कार दिली जाते पण, यापुढे मालकांनाही याची जबाबदारी घ्यावी लागेल. त्यामुळेच रेंट अ बाईक किंवा रेंट अ कारच्या चालकाकडून अपघात होऊन त्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकासोबतच मालकावरही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सरकार करीत आहे. सर्वसामान्य लोकांची सुरक्षा सरकारला महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.