परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयात जुगार; 7 पोलिसांवर गुन्हा:

पोलीस अधीक्षक कार्यालयात तिर्रट पोलिसांवर गुन्हा:
🔷 पत्ते खेळणारे 5 पोलिस निलंबित

परभणी– कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील बरॅकमध्येच जुगाराचा डाव मांडला. हा प्रकार २६ रोजी परभणी येथे उघडकीस आला. पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांनी स्वतः कारवाई करत ७ जुगारी पोलिसांना पकडले. त्यात परभणीतील ५, महामार्गावरील एक व लाचलुचपत विभागाच्या एका पोलिसाचा समावेश आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात ७ जुगारी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, ५ पोलिसांना निलंबित केले आहे.

परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील दुचाकी वाहनतळाच्या बाजूला असलेल्या बरॅकमध्ये (खोली) पत्त्यांचा डाव मांडल्याची माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली. त्यांनी स्वतः गुरुवारी रात्री ८.३० वाजता कारवाई केली. पोलिस कर्मचारी तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. कारवाईत रोख ५ हजार ९०० रुपये जप्त केलेअसून  याप्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण राठोड, पोलिस शिपाई मुंजाजी जामगे, पोलिस नाईक बालाजी रणेर, हवालदार विजय लांडगे, शेख रशीद शहा यांना निलंबित केले. ५ निलंबित पोलिसांसोबत विशाल ठाकूर, शेख मुख्तार अशा ७ जणांवर नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.