मसापच्या कविता रंगते कोजागिरीत कार्यक्रमात कवींनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध

🔷 कोजागिरी/साहित्य/कविता

🔷 प्रेम कविते बरोबर सामाजिक कवितांना परळीकरांची भरभरून दाद

बीड/परळ-वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- परळी मसापाचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्या संकल्पनेतून कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषदेच्या परळी शाखेने आयोजित केलेल्या ” कविता रंगते कोजागिरीत” या निमंत्रित कवींच्या मैफिलीला परळीतील रसिकांनी भरभरून दाद देत कवी संमेलनाचा आनंद लुटला.
परळीतील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यात अग्रेसर असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेने सलग तेराव्या वर्षी “कविता रंगते कोजागिरीत” या काव्यमैफिलीचे सुंदर आणि नेटके आयोजन केले होते.
वैद्यनाथ सांस्कृतिक सभागृह औद्योगिक वसाहत नाथ रोड परळी वैजनाथ येथे रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कविसंमेलनास परळीतील सुजान रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
प्रतिमापूजन व दीपप्रज्वलानंतर परळी मसापचे सचिव प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड यांनी उपस्थितांसमोर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. उद्घाटनपर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक संघाचे नेते पीएस घाडगे सर यांनी अध्यक्षीय समारोप केला आणि मग बहारदार अशा कवी संमेलनास सुरुवात झाली.

कविसंमेलनाची सूत्रे करमाळ्याचे प्राचार्य सुरेश शिंदे यांनी हाती घेतल्यानंतर या कार्यक्रमाचा नूर पालटला.
खचाखच भरलेल्या वैद्यनाथ सांस्कृतिक सभागृहांमध्ये सर्वच कवींनी रसिकांच्या काळजाला हात घालत आपल्या शब्दांच्या गुंफणीतून कधी मनसोक्त हसायला लावले तर कधी सामाजिक विषयावर भाष्य करून साहित्य रसिकांना अंतर्मुख केले.सलग तीन तास ही काव्यमैफील उत्तरोत्तर रंगत गेली.

“आपण सारे भाऊ भाऊ
चल भारतीय नागरिक होऊ,
संविधानाचं गाणं गाऊ… ”

ही भारतीयांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची भावना समृद्ध करणारी कविता सोयगावहून आलेले डॉ. स्वप्निल चौधरी यांनी सादर केली. त्यांनी “चल दंगल समजून घेऊ” आणि “गण्या” या कवितेतून सभागृहातील उपस्थित रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.

बापू जन्मायचंच असेल तर नका येऊ मुलगी होऊन ,
नाही तर या जन्मी पुन्हा होईल तुमचा खून….
या ‘ स्त्रीभ्रूणहत्या’ विषयावरील कवितेबरोबरच
” तू नेहमीच म्हणायचीस माझं प्रेम माझ्या डोळ्यात पहाय
पण खरं सांगू तुझ्या डोळ्यात मला दिसायचं काय
एका डोळ्यात बापाचा चिंतातुर चेहरा आणि दुसऱ्या डोळ्यात काळी पडलेली माय…. “अशा सामाजिक जाणिवावर भाष्य करतानाच हलक्या फुलक्या प्रेम कवितांनी सिल्लोडहून आलेल्या शब्बीर शेख यांनी या काव्यमैफलीत अनोखा रंग भरला.

“दोन हातांनी दोघांनी
झरा वाळूत काढला
गेलं गढूळ पाणी
झरा नितळ वाहिला
झरा थापता थापता
तिचा हात हाती आला
आणि हात हाती येता
वाती पेटवून गेला ”

रसिकांना हसवून लोटपोट करणाऱ्या या प्रेम कवितेबरोबरच
” मतांचे भरघोस पीक” अशा राजकीय भाष्य करणाऱ्या कविता प्रा. डॉ. सुरेश शिंदे यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली .