बेडेकर’ मसाल्याचे अतुल बेडेकर यांचे निधन

आजारपणात 56 व्या वर्षी निधन.

🔷 जगातील बहुतांश देशांत लोणच्याची निर्यात

मुंबई- महाराष्ट्रातील घराघरात आपल्या चविष्ट लोणच्यामुळे आपलंस झालेलं नाव म्हणजे बेडेकर लोणचे, बेडेकर मसाले. म्हणजेच व्हीपी बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. बेडेकर लोणचे, मसाले व चटणी या महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि पारंपरिक मराठी खाद्यपदार्थांना घरोघरी पोहोचवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बेडेकर मसाला नंतर अनेक मसाले उत्पादक कंपन्या लोणचे, चटणी, आणि लोणचे मसाला या क्षेत्रात उतरल्या पण बेडेकर हे नाव मात्र मराठी माणसाच्या जिभेवर सारख रेंगाळत राहणार नावं ठरलं.

मसाला व्यवसायाची कंपनी.- व्हीपी बेडेकर अँड सन्स बेडेकर लोणचे, मसाले व चटणीच्या पारंपरिक खाद्य व्यवसायातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. या कंपनीच्या यशाची कहाणीही फार रोचक आहे. विश्वनात परशराम बेडेकर यांनी 1910 मध्ये गिरगावात छोटेसे किराणा मालाचे दुकान सुरू केले होते. त्याच दुकानात त्यांनी मसाले व लोणची ठेवण्यास सुरुवात केली. या दोन्ही पदार्थ आणि त्याच्या चवीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर या दोन पदार्थांची चव अनेकांना मिळावी व व्यावसाय विस्तार दुकानाच्या शाखा काढण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने दादर, फोर्टमध्ये, माणकेश्वर मंदिरालगत बेडेकरांची अल्पावधीतच अनेक दुकाने झाली.

1943 मध्ये व्यवसायाचा व्याप वाढल्यानंतर व्ही पी बेडेकर अँड सन्स लिमिटेड असे त्यांनी कंपनीचे नामकरण केले. त्यानंतर  या कंपनीने अवघा महाराष्ट्र व्यापला. बेडेकरांच्या विविध उत्पादनाची महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांत विक्री होते. याशिवाय अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप व पूर्वेकडील देशांमध्येही लोणच्याची निर्यात होते. सद्यस्थितीत जेथें जेथें मराठी माणूस गेला आहे तेथें जगातील अनेक देशांत ही उत्पादने पोहोचली असून तेथेही त्यांची विक्री मोठी आहे.