समायोजनाची मागणी, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 580 कर्मचारी संपावर :

आरोग्य सेवा-
🔷आरोग्य सेवा कोलमडली, जि.प.समोर आयटक चे कामबंद आंदोलन

हिंगोली- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे या मागणीसाठी आयटक संघटनेच्या माध्यमातून संप पुकारला असून विविध संघटनांनी शुक्रवारी ता. 3 आंदोलन तिव्र करीत जिल्हा परिषदेसमोर ठाण मांडून कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी सुरु आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2008 पासून सुमारे 15 वर्षानंतरही या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळाले नाही. वैद्यिकय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अधिपरिचारीका,परिचारीका, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपीक आदी कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करीत आहेत. शासकिय रुग्णालयासह, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रामध्ये अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत.
हिंगोली येथील कर्मचार्यांनी 25 ऑक्टोबर पासून संप पुकारला आहे. संपामध्ये हिंगोली जिल्हयातील 580 कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली असून रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कर्मचारीच नसल्यामुळे आरोग्य सेवा देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिवाय लसीकरण मोहिम देखील थांबली आहे.

या कर्मचाऱ्यांना इतर राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शासकिय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र या मागणीसाठी शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्हयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर ठाण मांडून मागण्यांबाबत घोषणाबाजी सुरु केली आहे.