१ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी; लाच घेताना रंगेहाथ पकडले

गुन्हा/ लाचखोरी/करप्शन

अहमदनगर/  शासकीय , निमशासकीय कार्यालयात ही आपलं काम करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाचेची मागणी मागील काही वर्षापासून होत असल्याचं दिसून येत आहे. याचे प्रमाण ही सध्या वाढलेलं आढळून येत आहे एकूण राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोहिम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड येथील अभियंत्यास लाच घेताना पकडल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्येही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नगरमधील महाराष्ट्र औद्योगिक प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्याला तब्बल १ कोटींची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाल्हवरकर यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.

अमित गायकवाड (वय ३२ वर्ष , रा. नागापूर ) असे लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत तक्रारदार ठेकेदाराने १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते.

काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराने बिलाची मागणी केली. तेव्हा मागील बिल आउटवर्ड वर घेऊन तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी अभियंता अमित गायकवाड यांनी तक्रारदाराकडे १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराला धीर देऊन आरोपींनी मागितलेली रक्कम देण्यास सांगून सापळा रचला.ठरलेली रक्का शुक्रवारी सायंकाळी नगर-छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार गायकवाड हा रोडच्या बाजूला असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत आला. त्याला लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले.

घटनेचा पंचनामा उशिरा पर्यंत चालू होता. या प्रकरणी अहमदनगर च्या नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.