अच्युत पालव यांना जीवनगौरव

चित्रकला/कला आणि कलावंत /सुलेखन

मुंबई-आयआयटी, आयडीसी आणि बनारस हिंदू विश्व विद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड आर्ट यांनी आयोजित केलेल्या ‘टायपो डे’ या आंतरराष्ट्रीय टायपोग्राफी सेमिनारमध्ये सुलेखनातील सेवेचा गौरव म्हणून प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

पालव यांना देवनागरी आणि मोडी लिपी शिकविण्यासाठी जर्मनी, लंडन आणि नेदरलँड अशा देशांमधून आमंत्रण मिळाली असून, ते जगभर देवनागरीचा प्रचार करत आहेत. पालव यांनी तीन महिन्यांपूर्वी ८० रशियन मुलांना देवनागरीचे धडे दिले होते. तसेच मॉस्कोमध्ये प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. सन २००७मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करून त्यांनी देशभरात सुलेखनाचे महत्त्व पटवून दिले होते.

त्यांनी कॅलिफेस्टसारखे भारतीय लिप्यांचे उत्सव सुरू केले. पालव यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार, तसेच मानसन्मान मिळाले असून जगातल्या बऱ्याच संग्रहालयांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान जीवन गौरव पुरस्कारने करण्यात आला आहे. याप्रसंगी ‘आयडीसी’चे प्रा. रवी पोवय्या, प्रा. श्रीकुमार, ‘बीएचयू’चे प्रा. मनीष अरोरा, अजंता सेन, तसेच देशातील आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टायपोग्राफर आणि कॅलिग्राफर उपस्थित होते.

पालव यांनी १९७३मध्ये शिरोडकर हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक परशुराम नाबर यांच्या मार्गदर्शनाखाली फलक लेखनाला सुरुवात केली. पुढे जे. जे. इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये प्रवेश घेतला. ज्येष्ठ सुलेखनकार र. कृ. जोशी यांच्यामुळे त्यांची अक्षरांकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेली. देवनागरी आणि मोडी लिपी यांच्या समन्वयातून मुक्त लिपीही निर्माण केली.