मारवाडी युवा मंच व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा दिवाळी निमित्त खास उपक्रम
पार्श्वगायक नीरज वैद्य व संगिता भावसार सह आर.जे.प्रसित रूद्रवार यांच्या आवाजाने जिंकली रसीकांची मने
बीड/परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क – वेगवेगळे आषय, विषय आणि भावार्थ असलेल्या सुंदर आणि सुरेख गीत-संगिताच्या मैफलीने दिवाळीची पहाट अतिशय आणि प्रसन्न झाली. पहाटेचे वातावरण या मैफलीने आनंदीत आणि प्रफुल्लीत करून टाकले. मारवाडी युवा मंच आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा दिवाळी पहाट गाणी हा उपक्रम गेल्या २१ वर्षांपासून चालू असून तो कौतुकास्पद तर आहेच, परंतू अशा कार्यक्रमांमुळे परळीच्या सामाजिक, सांस्कृतीक वातावरणात खूप मोठे सकारात्मक बदल घडून येत असल्याचे प्रतिपादन आयएएस रोहीत गुट्टे यांनी केले. दिपावली निमित्त आयोजित पहाट गाणी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना व सर्वांनाच दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आयएएस सौ.पुनम रोहीत गुट्टे यांचीही उपस्थिती होती.
परळी आणि दिवाळी पहाट गाणी हे गेल्या २१ वर्षांपासूनचे समिकरण बनले आहे. मारवाडी युवा मंच आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येते. दि.१२ नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट गाणी या कार्यक्रमाचे औद्योगीक वसाहत येथे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस माता लक्ष्मीदेवी व दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. छत्रपती संभाजी नगर येथील संगीतराज गीत संगीतच्या संपूर्ण टीमचा या कार्यक्रमात सहभाग होता. ग्रुप व कॉन्सर्टचे निर्माते राजेश भावसार, प्रसिध्द निवेदक आर.जे.प्रेसित रूद्रवार, पार्श्वगायक व संगीतकार नीरज वैद्य, पार्श्वगायीका संगीता भावसार आदींच्या सुरेख आणि सुमधूर आवाजाने उपस्थित शेकडो रसिक श्रोत्यांची मने जिंकली.
पार्श्वगायक नीरज वैद्य आणि संगिता भावसार यांनी दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमात भक्तीगीत, भावगित, मराठी आणि हिंदी चित्रपट गित, गझल तसेच देशभक्तीपर गितं सादर केली. संपूर्ण कार्यक्रमाला एका माळेत गुंफण्याचे कठीण कार्यक आर.जे.प्रसित रूद्रवार यांनी केलेल्या बहारदार सुत्रसंचलनातून पार पडले. उपस्थितांकडून आलेल्या फर्माईससुध्दा या टिमने पूर्ण केल्या. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह ओम सारडा, सतिश सारडा, बालचंद लोढा, गोविंद सोमाणी, बद्रीनारायण बाहेती, जयपाल लाहोटी, अशोक भाला, रतन कोठारी, सतिश बंग, अशोक जाजू आदींनी केले. कार्यक्रमास संपादक, पत्रकार, डॉक्टर, वकील, साहीत्यीक, अभिनेते, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
घुंगरू चित्रपटाच्या पोस्टर लॉचिंग मान्यवरांचे सत्कार
प्रसिध्द नृत्यांगणा आणि सबसे कातील…. गौतमी पाटील अशी ओळख असलेल्या गौतमी पाटील हीचा घुंगरू हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. मनोरमा फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि चिंतामणी सिने क्रिएशनची ही प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे पोस्टर लॉन्चींग अर्थातच भित्तीपत्रीकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन कारण्यात आले. यावेळी चित्रपटात भूमिका साकारलेले परळीचे डॉ.अजित केंद्रे, प्रशांत तोतला, उषा चव्हाण, श्रीकृष्ण ढाकणे आदींचीही उपस्थिती होती. याचबरोबर महाराष्ट्र शासन चित्रपट व रंगभूमी विकास मंडळ, सांस्कृतीक मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी ग्लोबल अडगाव या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. याबद्दल अभिनेते तथा संपादक रानबा गायकवाड व दिग्दर्शक डॉ.सिध्दार्थ तायडे यांचा सन्मान करण्यात आला. येल्डा ग्रामस्थांच्या वतीने नाना स्मृती समारोहात येल्डा ग्रामभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय आघाव यांचा तर निरागस या लघुपटास आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विजया दहीवाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.