५४ व्या इफ्फीमधे जागतिक सिनेमातील सर्वोत्तम सिनेमे बघण्याची संधी

🔷 आजपासून  गोव्यात दिमाखदार सोहळ्याने महोत्सवाची सुरुवात.

गोवा/ पणजी- एम एन सी न्यूज नेटवर्क – रमाकांत मुंडे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना पुन्हा एकदा सिनेतारकांच्या झगमागाटाने प्रकाशमान करण्यासाठी, दरवर्षी भारतात होणारा, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव- इफ्फी ५४ पुन्हा एकदा, जगातील आणि भारतातील सर्वोत्तम सिनेमंचा खजाना घेऊन सज्ज झाला आहे. म्हणजेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पणजीतल्या श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते एकादिमाखदार सोहळ्यात या महोत्सवाचा शुभारंभ यावेळी अनुराग ठाकूर यांच्या हस्ते, आयनॉक्स संकुलात शुभारंभाच्या चित्रपटातील चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा सत्कार केला जाईल.

इफ्फी ५४ च्या उद्घाटनप्रसंगी अनुराग ठाकूर फिल्म बझारचे उद्घाटनही करतील. चित्रपट बाजार हा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा(एनएफडीसी) कडून दरवर्षी इफ्फी सोबत आयोजित केला जाणारा दक्षिण आशियातील सर्वात मोठा जागतिक चित्रपट बाजार आहे. या अंतर्गत, दक्षिण आशियातील चित्रपट आशय आणि प्रतिभांना पाठबळ देत चित्रपट निर्मिती आणि वितरणात मदत केली जाते.   फिल्म बाजार मुळे, दक्षिण आशियात जागतिक चित्रपटांच्या प्रचार देखील होऊ शकतो.नऊ दिवसांच्या ह्या महोत्सवात, जगातील सर्वोत्तम चित्रपट  सिनेरसिकांना दाखवले जाणार आहेत. चित्रपटाचा शुभारंभ, पुरस्कारप्राप्त ब्रिटिश चित्रपट निर्माते, स्टुअर्ट गॅट यांच्या, ‘कॅचिंग डस्ट’ या मनोवेधक थरारपटाच्या  आंतरराष्ट्रीय प्रीमियरने होणार आहे. तर, फ्रेंच दिग्दर्शक, नुरी बिल्गे सिलान यांनी दिग्दर्शित केलेला ड्राय ग्रासेस हा मिड फेस्ट म्हणजे महोत्सवातील मध्यवर्ती चित्रपट असेल आणि रॉबर्ट कोलोड् दिग्दर्शित द फेदरवेट  या चित्रपटाने ५४ व्या इफ्फीची सांगता होणार आहे.उद्घाटन समारंभात श्रिया सरन, नुसरत भरुचा, पंकज त्रिपाठी, शंतनू मोईत्रा, श्रेया घोषाल आणि सुखविंदर सिंग यांच्यासह सुपरस्टार माधुरी दीक्षित आणि शाहिद कपूर यांचे परफॉर्मन्स दाखवले जातील. त्याशिवाय, हॉलीवूडची अभिनेत्री, कॅथरीन झेटा जोन्ससह,सुपरस्टार सलमान खान, विद्या बालन, आयुष्मान खुराना, अनुपम खेर, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, अदिती राव हैदरी, एआर रहमान, श्रेया घोषाल, शंतनू मोईत्रा, सुखविंदर सिंग, अमित त्रिवेदी, असे अनेक कलाकार या  चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत.

ह्या महोत्सवाला, शुभेच्छा देत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आपल्या शुभ संदेशात म्हटले आहे, की आज जेव्हा आपण जो काही आशय बघतो आहोत, त्याला तंत्रज्ञानाने एक नवे स्वरूप दिले आहे, अशा युगात, चित्रपट महोत्सवांची लोकप्रियता हेच दाखवणारी आहे, की सिनेमाच्या अद्भुत अनुभवांचे आकर्षण चिरकाल टिकणारे आहे. ‘‘चित्रपट निर्मितीसाठी सहकार्य, संयुक्त निर्मिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घाळण्यासाठी, इफ्फी हे एक परिपूर्ण व्यासपीठ ठरले आहे. आमच्या चित्रपट निर्मात्यांचा सिनेमाचा ध्यास, इच्छाशक्ती आणि दिग्दर्शक तसेच चित्रपट निर्माते यांच्या सहकार्यामुळे इफ्फीचा दरवर्षी विस्तार होत आहे.’’असे ठाकूर यांनी म्हटले आहे.यावर्षी, महोत्सवाच्या चार स्थळांवर २७० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील. इफफी ला यावर्षी १०५ देशांमधून २ हजार ९२६ प्रवेशांसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट आंतरराष्ट्रीय अर्ज आले होते. यावर्षी, महोत्सवात १३ वर्ल्ड प्रीमियर्स, १८ इंटरनॅशनल प्रीमियर्स,६२ आशियाई आणि ८९ भारतीय प्रीमियर्स होतील. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कारासाठी १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवरून १० भाषांमध्ये ३२ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. १५ विशेष चित्रपटांमधे (१२ आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि ३ भारतीय चित्रपट) प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक पुरस्कारासाठी स्पर्धा होणार आहे.
डॉक्यु-मॉन्टेज या नव्या विभागात, जगभरातील आकर्षक माहितीपटांचे एक सुरेख मिश्रण दाखवले जाणार आहे.  भारताचे  ऑस्कर मध्ये प्रवेश करणारे माहितीपट तसेच आज चित्रपट निर्मितीमध्ये माहितीपटांचे वाढते महत्त्व या विभागात अधोरेखित केले जाणार आहे.

गांधी पदक पुरस्कार विभागात सात आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि युनेस्कोचे आदर्श प्रतिबिंबित करणारे तीन भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जातील.उदयोन्मुख प्रतिभेला वाव देण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा दाखला म्हणून, इफ्फीमध्ये प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शकांद्वारा  मास्टरक्लास, कार्यशाळा आणि पॅनेल चर्चांचे आयोजन देखील केले जाणार आहे. या वर्षी ७५ क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो उमेदवारांसाठी व्यावसायिक वर्ग देखील असणार आहेत , जे  विशेषत: दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांद्वारे तयार केलेले असतील आणि २० हून अधिक आघाडीच्या कंपन्यांच्या सहकार्याने भरतीसाठी एक प्रतिभावंतांचे शिबीर  आयोजित केले जाईल.एनएफडीसी फिल्म बाजारमध्ये  व्हीएफएक्स आणि टेक पॅव्हेलियन, माहितीपट आणि नॉन-फीचर प्रोजेक्ट्स/चित्रपटांचा परिचय, नॉलेज सिरीज आणि बुक टू बॉक्स ऑफिस सारखे उपक्रम असतील.याशिवाय, जुन्या भारतीय चित्रपटांच्या खराब झालेल्या सेल्युलॉइड रील्समधून राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहीम (एनएफएचएम) अंतर्गत एनएफडीसी-एनएफएआय यांनी केलेल्या जागतिक दर्जाच्या पुनर्संचयित चित्रपटांचे सात जागतिक प्रीमियरचा समावेश  असलेला  पुनर्संचयित क्लासिक्स विभाग देखील सुरु केला आहे.

या विभागात तीन आंतरराष्ट्रीय पुनर्संचयित चित्रपट देखील प्रदर्शित केले जातील.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार विभागाने सहभागी करून घेणाऱ्या दृश्य सामग्रीसह एक प्रदर्शन देखील स्थापित केले आहे , ज्यामधून चित्रपट  रसिकांना संवादात्मक प्रदर्शनांद्वारे चित्रपटांबद्दल अधिक माहिती जाणून घेता येईल. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. इफ्फीला भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून जगभरात लोकप्रिय बनवण्यासाठी कॅरावॅन , शिगमोत्सव, गोवा कार्निव्हल, सेल्फी पॉइंट्स, इफ्फी मर्कंडाइज आणि इतर उपक्रमांसह तीन ठिकाणी लोकांसाठी ओपन एअर स्क्रिनिंग देखील आयोजित केले जाईल .पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) या महोत्सवाशी संबंधित सर्व कार्यक्रमांवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये बातम्या प्रसिद्ध करेल.  प्रथमच स्थानिक प्रसारमाध्यमांची मागणी पूर्ण करत पत्र सूचना कार्यालय  कोकणी भाषेत देखील बातम्या  उपलब्ध करून देईल. पीआयबीची  सोशल मीडिया टीम पत्रकार परिषद आणि इतर कार्यक्रमांचे लाईव्ह स्ट्रीमिंग करेल, आपल्या सोशल मीडिया हँडलवर ताज्या बातम्या पोस्ट करेल. पत्र सूचना कार्यालयाने प्रसारमाध्यमांना आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी कार्यक्रम स्थळी माध्यम सुविधा केंद्र देखील उभारले आहे.चित्रपट महोत्सव अधिक सर्वसमावेशक आणि सुगम्य बनवण्यासाठी विशेष दिव्यांग प्रतिनिधींना सर्व स्क्रीनिंग आणि इतर ठिकाणी सहज जाता यावे यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दृष्टिहीन आणि एम्बेडेड सांकेतिक भाषेसाठी एम्बेडेड ऑडिओसह चित्रपट दाखवले जातील. विविध इंडियन पॅनोरमा चित्रपट यावेळी स्मार्टफोन आणि इअरफोन वापरून आपल्या पसंतीच्या भाषेत डबिंगसह  पाहता येतील.इफ्फी हा सर्वात मोठ्या  चित्रपट महोत्सवापैकी एक ठरावा या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे.उद्घाटन सोहळ्याचे  दूरदर्शनवर थेट प्रसारण केले जाईल. व्हायकॉम मीडिया प्रा. लि . हे उद्घाटन आणि समारोप समारंभातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खास माध्यम आणि प्रसारण भागीदार असून समारंभांचे प्रसारण कलर्स टीव्ही वाहिनी आणि त्याचा ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा वर केले जाईल.