मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे आदि मंत्र्यांच्या उपस्थिती
बीड /परळी वैजनाथ/ एम एन सी न्यूज नेटवर्क : शिंदे-फडणवीसांनी सत्तेत आल्यानंतर राबविलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून ‘शासन आपल्या दारी’ कडे पाहिले जाते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असलेला हा कार्यक्रम राज्यात अनेक ठिकाणी पार पडला. अखेर येत्या १ डिसेंबरला परळीत शासन दारी कार्यक्रम होणार असल्याचे समजते.
महायुती सरकारचा महत्त्वकांक्षी, जिल्ह्यात राजकीय झालर लागलेला आणि विविध कारणांनी वर्षभरापासून पुढे ढकलत असलेला शासन आपल्या दारी उपक्रमाचा मुर्त अंतिम टप्प्यात आहे. मात्र, येत्या एक डिसेंबरला परळीत होऊ घातलेल्या कार्यक्रमा खर्च पाच कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. आता यातून लाभार्थीना खरोखर योजनांचा लाभ मिळणार का हे पहावे लागणार आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस यांचं महायुती सरकार सत्तेवर आले. यानंतर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली लाभार्थीना मिळावा, यासाठी शासन आपल्या दारी हा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला. सुरुवातीला शिवसेना पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आग्रही होते. मात्र, कार्यक्रमाचा मंडप, जेवणावळ, लाभार्थ्यांची ने आण करण्यासाठी लागणारा निधी कुठून खर्च करायचा असा पेच प्रशासनासमोर होता. त्यामुळे प्रशासनाकडूनच कार्यक्रमाबाबत शासनाला वारंवार ‘थांबा’ असा निरोप जात होता.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाली आणि धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रिपद आले. मुंडे यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमासाठी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन जिल्हा नियोजन समितीमधून केले. बीडला होणारा कार्यक्रम परळीत नियोजित केला. मात्र, परळीतील कार्यक्रमावर राष्ट्रवादीचा वरचष्मा राहणार असल्याने भाजप आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कार्यक्रम नको अशी भूमिका माइली. त्यामुळे पुन्हा कार्यक्रम लांबला. तर, मागचे दोन महिने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही कार्यक्रम होऊ शकला नाही. अखेर भाजपच्या नकारानंतरही परळीतच कार्यक्रम निश्चित झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर काही नेल्यांची या उपक्रमाला उपस्थिती राहणार आहे. मागील दहा दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून कार्यक्रमाची तयारी सुरु आहे.
5 कोटीहून अधिक रक्कम खर्च होण्याचा अंदाज
सुरुवातीला २७ नोव्हेंबर ठरलेली तारीख पुन्हा तीन डिसेंबर झाली तर आता एक डिसेंबरला कार्यक्रम जवळपास निश्चित झाला आहे. मात्र, कार्यक्रमासाठीचा मंडप, जेवणावळ, लाभार्थीची बसने वाहतूक यासाठी पाच कोटींहून अधिक रक्कम खर्च होण्याचा अंदाज आहे.
580 बसेसची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्यांनी तीन दिवसांच्या मंडपासाठी दोन कोटी ३३ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. तर, जेवणावळीचा खर्चही याच घरात जाऊ शकतो. कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून लाभार्थी गोळा केले जाणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल 580 बसची राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी केली आहे.