🔷 ग्राहक हित-
◾गॅस विक्रेते, एजन्सी धारक यांची बैठक.
◾ अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांचे गॅस वितरकांना निर्देश
छत्रपती संभाजीनगर- गॅस ग्राहकांना सिलिंडर घरपोच देते वेळी गॅस वितरकांनी सिलिंडर वजन करुन द्यावे व त्यासाठी घरपोच वाहनांमध्ये वजन काटा ठेवावा, ग्राहकांनी मागणी केल्यास वजन करुन त्यांचे शंका दूर करावी, असे निर्देश संभाजी नगर चे अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी आज जिल्ह्यातील घरगुती गॅस वितरक, एजन्सीधारक यांना दिले.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गॅस वितरक, एजन्सीधारक, विक्रेते यांची एक बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, कंपनीचे विक्री अधिकारी प्रगती लाड, निलेश लठे, गोविंद पटेल तसेच सर्व गॅस वितरक आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी लोखंडे म्हणाले की, ग्राहकांना सिलिंडर देतांना ग्राहकाने मागणी केल्यास त्यास सिलिंडर वजन करुन द्यावे, ग्राहकाचे शंका निरसन करावे. गॅस सिलिंडर साठी ‘बुकिंग ते प्रत्यक्ष वितरण’ ही प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाते. त्या प्रत्येक पातळीवर ‘एसएमएस’द्वारे ग्राहकाला माहिती जाणे बंधनकारक आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी भोसले म्हणाल्या की, ग्रामिण भागात गॅस सिलिंडर घरपोच डिलिव्हरी होत नसल्याच्या तक्रारी आहेत,ग्राहकांना सिलिंडर वाहून न्यावे लागू नये, असे त्यांनी सांगितले. नवीन गॅस सिलिंडर साठी ग्राहकांनी केवळ मिस कॉल दिला तरी बुकींग होते. या व्यतिरिक्त ग्राहकाने सेवेबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी सूचना कराव्यात.