बीड/परळी वैजनाथ / एम एन सी न्यून नेटवर्क दि.०८ –
श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शनिमंदिरात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा,शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर मान्यवरांनी श्री.जगनाडे महाराज यांचा जिवनपट मांडला. हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील एक प्रमुख टाळकरी होते. तुकाराम महाराजांनी ज्या रचना रचल्या त्या सर्व जगनाडे महाराजांना मुखोद्गत होत्या. तुकाराम महाराजांच्या रचना व गाथा लिहीण्याचे कार्य संताजी जगनाडे महाराजांनी केले. तेली समाज संताजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो. त्यामुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात परिचय झाला. वारकरी संप्रदाय गेल्या अनेक वर्षांपासून जयंती, पुण्यतिथी साजरी करतात. तसेच महाराष्ट्र शासनाने शासकीय परिपत्रकामध्ये जयंतीचा समावेश केला. या कार्यक्रमास संघटनेचे सदस्य, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.