परळीत श्रीराम कथेचा उत्साहात समारोप

पंकजाताई मुंडेंची  उपस्थिती भाविकांत बसून केले कथा श्रवण

बीड /परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क -चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेचा समारोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यासह हजारो भाविक भक्तांच्या साक्षीने आज मोठया उत्साहात संपन्न झाला. पंकजाताईंनी भाविकांत बसून कथा श्रवणाचा लाभ घेतल्याने त्यांचा साधेपणा फुन्हा एकदा दिसून आला.

पुणे येथील चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी २ डिसेंबर पासून श्री रामकथेचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा समारोप आज झाला. राम कथा निरूपणकार श्री रविंद्र पाठक यांच्या सुश्राव्य आणि संगीतमय रामकथा श्रवणाचा हजारो भाविक भक्तांनी यावेळी लाभ घेतला. आजच्या समारोपाला भाजप नेत्या पंकजाताई मुंडे उपस्थित होत्या, त्यांनी भाविकांत बसून कथा श्रवण केले, कथा समाप्तीनंतर त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली, यावेळी निरूपणकार पाठक यांनी त्यांचा आशीर्वाद रूपी सत्कार केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना पंकजाताईंनी श्रीरामकथा ही परळीकरांसाठी मोठी पर्वणी ठरल्याचे सांगत पाठक यांच्या अमोघ वाणीचे मनापासून कौतुक केले. मर्यादा पुरूषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारण्याची आज गरज आहे असे प्रतिपादन केले. भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुचिता पोखरकर, नितीन समशेट्टे, प्रितेश तोतला, आश्विन मोगरकर आदी यावेळी उपस्थित होते.

रविंद्र पाठक यांचा यशःश्रीवर सत्कार
————–
श्रीराम कथा निरूपणकार रविंद्र पाठक यांनी दुपारी यशःश्री निवासस्थानी भेट दिली. यावेळी प्रज्ञाताई मुंडे, पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी पाठक यांचा सपत्नीक कौटुंबिक सत्कार केला. श्रीराम कथेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल भाविकांच्या वतीने पंकजाताईंनी त्यांचे आभार मानले.