बीड/परळी वैजनाथ/एम एन सी न्यूज नेटवर्क- , दि.१७ दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७४ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयात उद्या मंगळवारी (दि.१९) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता “आजची आंदोलने राष्ट्रहितास तारक की मारक ?” हा विषय ठेवण्यात आला आहे. इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व वयाची मर्यादा २२ वर्षाच्या आत असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या एका संघास या स्पर्धेत सहभाग घेता येईल. संघातील एका विद्यार्थ्यास विषयाच्या अनुकूल बाजूने तर दुसऱ्या विद्यार्थ्यास प्रतिकूल बाजूने विचार मांडण्याकरिता सात मिनिटांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे.
या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या वाक्पटूंना रु.७००० (प्रथम), रु.५००० (द्वितीय), रु.३००० (तृतीय ) व रु.१००० (उत्तेजनार्थ) व यासोबत स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सर्वाधिक गुण मिळवलेल्या संघास “सांघिक पारितोषिक” देण्यात येईल. महाविद्यालयाच्या सभागृहात स.१० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन संपन्न होईल,तर दु.३ वाजता पारितोषिक वितरण होईल. स्पर्धाकांनी येथे वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे पत्र ओळखपत्र व आधार कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे. . तरी या स्पर्धेत सर्व महाविद्यालयाच्या संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी.राठोड उपप्राचार्य सर्वश्री डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्रा. डी.के. आंधळे, प्रा. एच.डी. मुंडे, संयोजक प्रा .डॉ. नयनकुमार आचार्य (९४२०३३०१७८), सहसंयोजक प्रा.डॉ. अर्चना चव्हाण (७९७७९२६२२५), डॉ. रामेश्वर चाटे (८९९९४६१६१६) प्रा. वाय. डी. रेड्डी (९२८४८३५७१८) , प्रा. दिलीप गायकवाड (९१६८११४४०७) यांनी केले आहे.