लग्नातील खर्च मर्यादित करण्याचा आदर्श निर्णय

पालकांनी विचार करण्याची गरज

बीड/परळी वैजनाथ/एम एन सि न्यूज नेटवर्क – समाज हिताच्या अनेक गोष्टी समाज माध्यमावर सातत्याने इकडून तिकडं फॉरवर्ड केल्या जातात पाठवल्या जातात सोशल माध्यामावर सर्वच वाईट गोष्टी येतात असे नाही.काही चांगल्या समाज हिताच्या बाबी सुध्दा येत असतात. नुकतंच औरंगाबाद शहरातील जैन समाजाने विवाह सोहळ्या आणि इतर कार्यक्रमाला अनावश्यक खर्चाला फाटा देण्यासाठी एक निर्णय केल्याची पोस्ट वाचण्यात आली तिची सत्यता तपासण्यापेक्षा त्यात मांडलेला विचार महत्त्वाचा वाटला.

औरंगाबाद शहरातील जैन समाजाने परवा रविवारी एक चांगला निर्णय घेतला. जैन समाजातील कोणाच्याही लग्नात ६ पदार्थांपेक्षा जास्त पदार्थ असतील तर त्या लग्नात वधू वरांना फक्त आशिर्वाद द्यायचे. परंतु जेवण करायचे नाही असा निर्णय घेतला. आणि त्याच अनुकरण करत अग्रवाल समाजानेही वरील निर्णय राबवायचे ठरवले आहे. याबरोबरचं लग्न पत्रिका छपायची नाही तर फक्त whatsapp व फोन द्वारे निमंत्रण द्यायचे.
खास निर्णय म्हणजे प्रि- वेडींग व संगीत संध्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे, वरील दोन्ही समाज (जैन व अग्रवाल ) आर्थिक दृष्ट्या भक्कम असून देखील त्यांनी वरील निर्णय घेतले. त्या बद्दल दोन्ही समाजाने एक आदर्श निर्माण केला आहे.

◾बदल आवश्यक आहे.
आपण साखरपुड्याचा खर्च लग्नाएवढा करायला लागलो आहोत. वेळ प्रसंगी कर्ज काढून लग्नाचा बडेजाव करतो. आता आपण बदलेले पाहिजे हे नक्की.
सर्वांसाठी आदर्श व अनुकरणीय निर्णयाचे मनापासून स्वागत करावयास हवे . आणि सर्व जाती धर्म पंथ यांनी या निर्णयाचे सर्वांनी पालन करा. मुला मुलींच्या पालकांनी निश्चितच याचा विचार केला पाहिजे.कर्ज काढून लग्न करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत लग्न सोहळा पार पाडता येतो.

काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने लक्षात आली होती,परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रुपये उधळू लागले आहेत.आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत .आतातरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही.

◾ भपकेबाज सोहळ्या पेक्षा साधेपणा हवा असाही एक सूर आहे

विवाह हा सोहळा नाही तर तो ‘ संस्कार ‘ आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात.आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला अवॉर्ड मिळाला नाही, स्वागत समारंभात साधेपणा आणावा. सध्याच्या महागाई च्या काळात आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे. महागड्या लग्न पत्रिकेचा खर्च वाचऊन साधेपणाने निमंत्रण देता येइल कालानुरूप कोणत्याही जातीधर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्विकार केलाच पाहिजे .
कर्ज काढून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्या पेक्षा समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. तर मग सुधारणांची सुरुवात स्वतः पासून करत व अनावश्यक खर्चाला फाटा देऊन लग्न सोहळा पार पडला तर दोन्ही कुटुंबाची आर्थिक बचत होईल.कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही.