कोकण रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून महिनाभरात २ कोटींचा दंड वसूल

कोकण रेल्वे मार्गावर ७ हजार विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

मडगाव :वृत्तसंस्था- कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांतून अनेकजण विनातिकीट प्रवास करताना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवीत असून चालू वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात सुमारे ७ हजार १३ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापूर्वी या मार्गावर मोठ्या प्रमाणात दंड वसुली करण्यात आली होती.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांतून तिकीट नसताना प्रवास करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करत फुकटात प्रवास  करणाऱ्या प्रवाशांना आळा बसण्यासाठी कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. कोकण रेल्वे मार्गावर चालू वर्षात माहे ऑगस्ट ते ऑक्‍टोबर २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १४,१५० अनधिकृत तिकीट नसलेले प्रवासी आढळून आले व त्यांना दंड आकारण्यात आला. यातून एकूण ८६ लाख ३७ हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला. एकूणच मागील काही दिवसात रेल्वे कडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसुली केली असून काही आकडे खालील प्रमाणे आहेत. २३ ऑगस्टपर्यंत ४,४८४ प्रवाशांकडून २६ लाख ६७ हजार ५५५ रुपये दंड वसूल केला. २३ सप्टेंबरपर्यंत ४,८८८ प्रवाशांकडून २७ लाख ९ हजार ७०० दंड वसूल करण्यात आला. २३ ऑक्टोबरपर्यंत ४,७७८ प्रकरणे नोंद करत ३२ लाख ६० हजार ५६५ रुपये दंड वसूल केला. मात्र नोव्हेंबरमध्ये ही मोहीम तीव्र करत ७,०१३ जणांवर कारवाई करत २ कोटी ५ लाख ५२ हजार ४४५ रुपये दंड वसूल केलेला आहे.
मुंबईकडून कोकण मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अनेक गाड्यांना तुफान गर्दी असते. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे अधिकृत तिकीट धारकांना मोठा मनस्ताप ही सहन करावा लागतो. त्यामुळे विना तिकीट प्रवाशावर होत असलेल्या कारवाईमुळे अधिकृत तिकीट प्रवासी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.