नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023, भारतीय न्याय संहिता, 2023 आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, 2023 संसदेने मंजूर झाल्याबद्दल प्रशंसा केली आणि हा भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्षण असल्याचे नमूद केले.
या विधेयकांमध्ये समाजातील गरीब, वंचित आणि असुरक्षित घटकांसाठी वर्धित संरक्षण सुनिश्चित केले असून संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि अशा इतर गुन्ह्यांवरही मोठ्या प्रमाणात प्रहार करतात, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की, या कायदेशीर सुधारणा भारताच्या कायदेशीर चौकटीला अमृत काळात अधिक प्रासंगिक आणि सहानुभूतीने प्रेरित होण्यासाठी नव्याने परिभाषित करतात. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत तीन विधेयकांवर चर्चा करतानाचा व्हिडिओही त्यांनी सामायिक केला आहे.
‘एक्स’ वरील थ्रेड पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले:-“भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023, भारतीय न्याय संहिता, 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 पारित होणे हा आपल्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्षण आहे. या विधेयकांमुळे वसाहतवाद कालीन कायदे नामशेष झाले आहेत. सार्वजनिक सेवा आणि कल्याण केंद्रीत कायद्यांसह एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे.
ही परिवर्तनकारी विधेयके म्हणजे सुधारणा घडवण्यासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेची साक्ष आहेत. ही विधेयके तंत्रज्ञान तसेच न्यायवैद्यक शास्त्रावर लक्ष केंद्रित करून आपल्या कायद्यांच्या, पोलिसांच्या आणि तपासणीच्यायंत्रणांना आधुनिक युगात घेऊन येणार आहेत. ही विधेयके आपल्या समाजातील गरीब, दुर्लक्षित आणि असुरक्षित घटकांना वाढीव संरक्षण मिळेल याची काळजी घेणार आहेत. त्याच वेळी, सुसंघटीत गुन्हे, दहशतवाद आणि प्रगतीच्या दिशेने होत असलेल्या आपल्या शांततापूर्ण वाटचालीच्या मुळाशी घाव घालणाऱ्या इतर अनेक गुन्ह्यांच्या विरोधात कठोर कारवाईसाठी ही विधेयके उपयुक्त ठरतील. या विधेयकांच्या माध्यमातून आपण राजद्रोहासंदर्भात कालबाह्य ठरलेल्या कायद्यांना रजा देखील दिली आहे.
आपल्या अमृत काळात, आपली कायदेविषयक चौकट अधिक समर्पक तसेच सहानुभूतीपूर्ण करण्यासाठी या कायदेशीर सुधारणा नव्या मार्गांचा अवलंब करतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ही भाषणे या विधेयकांच्या ठळक वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती देतात.