क्रिडा विश्व / कबड्डी
मुंबई : कबड्डीचे उत्तम समालोचक, राष्ट्रीय पंच, खेळाडू, नाट्य कलाकार, पत्रकार असे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेले
किशोर दादू गावडे (६२) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सविता, अमेय व अथर्व ही दोन मुले तसेच सून व नातू असा परिवार आहे. भांडुप येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या आवाज आणि शब्दोच्चाराच्या मदतीने त्यांनी कबड्डीत समालोचक म्हणून नावलौकिक मिळवला. स्पष्ट शब्दोच्चार, योग्य असा भारदस्त आवाजामुळे कबड्डी क्रीडारसिक त्यांच्या समालोचनाने मंत्रमुग्ध होत असत. देवगड तालुक्यातील जामसांडे येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवणीत केलेले समालोचन स्थानिकांना प्रचंड आवडले.
अनेक अखिल भारतीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये आपल्या समालोचनाच्या ओघवत्या शैलीने त्यांनी कबड्डी रसिकांना आपलेसे केले होते.
