वंदे भारतची निर्मिती लवकरच लातूर कोच फॅक्टरीत

उपमुख्यमंत्री फडणवीसांची जालन्यातील वंदे भारत उद्घाटन कार्यक्रमात ग्वाही 

जालना :  येत्या काळात तयार होणारी वंदे भारत रेल्वे मराठवाड्याच्या विकासात भर घालणाऱ्या लातूर येथील कोच फॅक्टरीतून होईल,अशी ग्वाहीराज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दि. ३० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्थानकावरून दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना – मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.वंदे  भारत एक्सप्रेस  या गाड्या अत्याधुनिक सुविधा युक्त आहेत. दरम्यान  एकाच वेळी ६ वंदे भारत एक्सप्रेस व  दोन अमृत भारत या गाड्यांचा शुभारंभ झाला.

या सोहळ्यानिमित्त जालना रेल्वे स्थानकाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,
पालकमंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार बबनराव लोणीकर आ. कैलास गोरंट्याल, आ. नारायण कुचे, आ. राजेश राठोड आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त रेल्वे
आहे. महाराष्ट्रात ही सहावी वंदे भारत एक्सप्रेस  जालन्यातून सुरू झाली आहे. ही गाडी सध्या ताशी १६० किलोमीटर वेगाने
जाणारी ही ट्रेन दोन वर्षांत ताशी २५० किमी किलोमीटरने धावेल. महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरु आहेत. यावर्षी १३ हजार कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत.
अशाप्रकारे रेल्वेचा अभूतपूर्व विस्तार करण्यात येत आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई येथे कामानिमित्ताने जाण्यासाठी उत्तम सोय व्हावी या उद्देशाने जालना येथून वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जालना- छत्रपती संभाजीनगर- नाशिक-ठाणे ते मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असेल. प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस
आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या
प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.