वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांची माहिती
रत्नागिरी /चिपळूण एम एन सी न्यूज नेटवर्क – वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सतर्फे दि. ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी कृषी, पशु संवर्धन प्रदर्शन २०२४ महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. शेतीच्या विकासासाठी मार्गदर्शक आधुनिक शेती तंत्राच्या माहितीचा खजिना उलगडणारं कृषी प्रदर्शन होईल, असा विश्वास व्यक्त करताना या महोत्सवात शेती व पशुपालन-पशुसंवर्धन प्रशिक्षण मार्गदर्शनपर संवाद दिनांक ६ व ७ जानेवारी रोजी होणार आहे, अशी माहिती वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
सदरील महोत्सव चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या शेजारील चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत असेल.
कोकणात दुग्धव्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना गेल्या अनेक वर्षांपासून रुजलेली आहे. मात्र, याला छेद देत परिपूर्ण आणि अत्याधुनिक दुग्धप्रकल्पाची उभारणी करून सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट दर्जेदार उत्पादनांमुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा प्रकल्प यशस्वीपणे दिमाखदार वाटचाल करीत आहे.कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यावी, इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, हे स्वप्न उराशी बाळगून वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांसह अनेक लोकांना रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या आहेत. मात्र, आता एवढ्यावरच न थांबता दुग्ध व्यवसायाबरोबरच येथील शेतकरी आर्थिकदृष्टीने सक्षम झाला पाहिजे. शेतकऱ्यांना रोजगाराच्या वाटा निर्माण होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
हजारो वर्षांपासून पशुसंवर्धन व्यवसाय शेती व्यवसायाला पूरक म्हणून केला जातो. भारतातील शेतकऱ्यांसाठी पूर्वीपासूनच हे एक उपजीविकेचे साधन राहिले आहे, आज मात्र हे एक स्वतंत्र उद्योगक्षेत्र म्हणून ओळखले जाते. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संधी या कार्यक्षेत्रात निर्माण झाल्या आहेत, मात्र त्यासाठी योग्य प्रशिक्षणाची आणि पुरेशा अनुभवाची गरज आहे.
प्राण्यांची उत्पादकता, खाद्य, प्रजनन आणि शेती व्यवस्थापन- महोत्सवात दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत डॉ. डी. टी. भोसले यांचे प्राण्यांची उत्पादकता, खाद्य, प्रजनन आणि शेती व्यवस्थापन या विषयावर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी संशोधन केंद्र आवाशीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर जगताप यांचे कोकणातील फायदेशीर भात लागवड भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर सकाळी १०.४५ वाजता, उद्यान विद्या महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल माळी यांचे सकाळी ११.३० वाजता कोकणातील मुद्द्यवर्गीय पिकाचे व हळद लागवड या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत
कोकणातील पशु व पशुपालन व्यवस्थापन- दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत कोकणातील पशु व पशुपालन व्यवस्थापन या विषयावर पशुवैद्यकीय चिकित्सा विभाग, चिपळूणचे सहाय्यक आयुक्त डॉ. दत्तात्रय शंकर सोनावले यांचे सकाळी ११ ते १२ या वेळेत गोदरेज ऍग्रोव्हेटचे पशु आहार तज्ञ डॉ. रमेश पताळे पशुआहार व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरी येथील सहाय्यक संशोधन अधिकारी तथा प्रकल्प प्रमुख खेकडा प्रकल्पाचे कल्पेश शिंदे यांचे बंदिस्त खेकडा पालन अर्थार्जनाचे नवे पर्व या विषयावर मार्गदर्शन होईल.
या कृषी महोत्सवातील कोकणातील शेतकऱ्यांना या शेती व पशुपालन विषयी प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करतांना शेतकऱ्यांनी या कृषी प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.
