संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षिका असे तिहेरी कर्तव्य क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी पार पाडले-धनंजय आरबुने

परळी उपजिल्हा रुग्णालयात सावित्रीबाई फुले यांचे जयंती साजरी

बीड /परळी-वैजनाथ एम एन सी न्यूज नेटवर्क:– जोतीराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्याच्या ओसरीवर स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना नियुक्त केले. या पासूनच स्त्री शिक्षणाच्या महान पर्वाला सुरुवात झाली. संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षिका असे तिहेरी कर्तव्य क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी पार पाडले. पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ठरल्या असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांनी केले. परळी उपजिल्हा रुग्णालय परळी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे परळी तालुका निमंत्रक जगदीश शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली गंजेवार, डॉ. निळे, डॉ. पवार, अस्थिरोग तज्ञ डॉ कदम, डॉ. शरद चव्हाण, परिसेविका श्रीमती गायकवाड, टाकळकर ,कुलकर्णी, जगतकर, गुंडरे ,सहाय्यक अधीक्षक श्री भोसले ,वरिष्ठ क्लर्क श्री प्रशांत कराड, औषध निर्माण अधिकारी श्री गंगाधर फड ,प्रभाकर दिक्कतवार आदिसह परळी उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने म्हणाले की, जातीभेदाच्या, विषमतेच्या श्रृंखला तोडण्यासाठी ‘शिक्षण’ हेच साधन आहे. १८४८ ते १८५२ या दरम्यान पुणे आणि सातारा परिसरात जवळपास १८ शाळा या फुले दांपत्याने चालू केल्या होत्या. या सर्व व्यवस्थापन सावित्रीबाई पाहत होत्या. संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षिका असे तिहेरी कर्तव्य त्या तळमळीने पार पाडत होत्या. त्यांच्या सेवाकार्याने स्त्री शिक्षणाचे नवे युग निर्माण केले. असे ही ते म्हणाले.