विदर्भातील “किल्ले गाविलगड”

🔸#पर्यटन/ 🔸#भटकंती/🔸#छायाचित्रे 🔸 #ट्रेक

🔷 आपल्या भटकंतीच्या छंदापाई राज्यभर पुरातन वास्तू, ऐतिहासिक किल्ले, गढी, मंदिरे, जंगल सफर, यांना भेट देऊन उत्कृष्ट अशी त्याची छायाचित्रण करून फेसबुक वर आणि आपल्या इतर माध्यमाद्वारे इतरांपर्यंत पोहोचण्याचा सातत्याने प्रयत्नकरतात.

नमिता प्रशांत यांच्या स्थळभेटी, स्थळाचे  अप्रतिम छायाचित्रें, सखोल माहिती त्या देत असतात, अतिशय ओघवत्या आणि रसाळ लिखाण शैलीत प्रत्यक्ष ते स्थळ आपल्या नजरेसमोर उभा राहील असं त्यांचे प्रवास वर्णन निश्चितच आपणा सर्वांना आवडेल.

……………………………………………..

“किल्ले गाविलगड”.

अमरावती-  नमिता प्रशांत- अत्यंत अभिमानाने वर्णावा असा, महाराष्ट्रातील महत्वपूर्ण एक आणि विदर्भातील अतिशय नावाजलेला, इतिहासातील काही पानेच नाही तर स्वतःची स्वतंत्र अशी डायरीच स्वतःच्या नावावर लिहून काढणारा,अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणजे आमचा ” किल्ले गावीलगड ”


आमच्या अमरावतीला लाभलेलं प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण “चिखलदरा” सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र सातपुडा पर्वतरांगांवरती आपले अजस्त्र बाहू पसरून उभा असलेला चिखलदर्याचा “किल्ले गावीलगड” तेवढा कुणी माहिती करून घेतलेला नाही. अख्खा किल्ला बघायला निदान दोन दिवसतरी हातात हवेत. जवळपास बारा किलोमीटर चा परिसर पायी तुडवायची मज्जाच वेगळी आहे. फक्त किल्ल्याचा आतील परिसर वनविभागाच्या अख्त्यारीत येत असल्याने गाईड आवश्यक आहे. चित्रकार, छायाचित्रकार आणि सिनेमॅटोग्राफर यांच्यासाठी पर्वनीच…असो…


“किल्ले गावीलगड”…. फक्त शत्रूशी झुंजत राहणे हाच याचा स्वभाव म्हणा अथवा नियती पण या किल्ल्याच्या धीरोदत्तपणाची आजही येथील भग्न अवशेषावरून जाणीव होते. इतिहास सांगतो, की नेहमी दिल्लीने दख्खनचे आणि दख्खनने दिल्लीचे स्वप्न पाहावे, त्याकरिता वाट्टेल त्या कुरघोड्या कराव्यात आणि भारताच्या मधोमध असलेल्या सातपुडा रांजीतील या बलाढ्य किल्ल्याने मात्र तठस्थपणे सर्वांना तोंड देत राहावं. आमचं घाटवळणातील सौंदर्यच जणू आमच्यासाठी शाप ठरावं, असं या अभेद्य तटबंदीला सतत ओरखडे देण्याचं काम इतिहासातील त्या त्या काळच्या प्रत्येकच राज्यकर्त्यांनी केलंय… मात्र ‘झुकेंगा नहीं साला’ म्हणत किल्ले गावीलगड प्रत्येक काळात लढत राहिला.


किल्ले गावीलगड ची माहिती थोडक्यात सांगणे जसं शक्य नाही तसंच याबद्दल थोडक्यात ऐकणेदेखील न्याय्य नाही.
अतिशय प्राचीन इतिहास लाभलेला म्हणजेच महाभारताच्या काळापासून स्वतःचा इतिहास रचणारा आमचा गावीलगड निवांत ऐकावा, वाचावा, अनुभवावा,अभ्यासावा असाच आहे.
यंदा शौर्यदिनाच्या निमित्ताने, अमरावतीचे प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व पर्यावरणवादी श्री. जयंतदादा वडतकर यांचे संगे जाण्याचा योग आला होता आणि एक अविस्मरणीय सहल घडली. जयंत दादांनी किल्ल्याची अभूतपूर्व माहिती तर दिलीच शिवाय अत्यंत रमनीय असा किल्ल्याच्या आतील परिसरही फिरवून आणला. सोबतीला वनविभागातील अधिकारी तसेंच कर्मचारीही होते त्यामुळे प्रश्नोत्तरं आणि त्यातून उत्पन्न चर्चेने एकंदरीत मज्जा आली. वारंवार करावासा वाटावा असा हा गावीलगड ट्रेक आहे.

– नमिताप्रशांत 🌿

  • 🔸 सर्व छायाचित्रं, लिखाण नमिता प्रशांत यांच्या फेसबुक वॉल वरून साभार