तीन तोंडी टाकं (Three mouth tank)

पर्यटन/भ्रमंती/प्रवास/  छायाचित्रे

पातूर, अकोला.🌿

 के नमिता प्रशांत- एम एन सी न्यूज नेटवर्क – अकोल्यापासून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर भंडारज जवळ, शिर्ला नांदखेड शिवारात टेकड्यांवर प्राचीन असें पाण्याचे तीन तोंडी टाके आहे. अगदी राज्यमहामार्गाच्या एका बाजूस हे तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस भंडारज चिखलगाव शिवारात पाच तोंडी टाके आहे असेही कळले होते, मात्र पाच तोंडी टाक्याबद्दल स्थानिकांनी कुठलीही माहिती दिली नाही.
या टाक्या कोणी, कुठल्या उद्देशाने खोदल्या असाव्यात याची ठोस माहिती मिळाली नाही. मात्र अकोला गॅझेटीअर मध्ये पातूरच्या लेण्यासंदर्भात जी माहिती दिलेली आहे त्यानुसार पुरातन काळी बौद्ध उपासकांकरिता निवासाची तसेंच पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सोय केलेली असे. हे त्याच उद्देशाने बांधलेले असावे का???असे वाटत असतांनाच, येथे आढळलेल्या रॉक कप्युल्सवरून या जागांच्या प्राचीनतेची जाणीव होतेच, तसेंच हे पाण्याचे टाके नसून इथल्या ठिसूळ दगडामुळे अर्धवट टाकून दिलेले गुफांचे बांधकाम असावे असे वाटते. नाहीतर येथेही आपल्याला जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ सारखीच अतुलनीय वास्तूकला अनुभवता आली असती. डोंगराच्या आत कोरलेल्या या टाक्या खोल असून जवळपास पन्नास ते साठ माणसे आरामात झोपू शकतील एवढ्या रुंद आहेत. कदाचित २००फुटांपेक्षा जास्तच. या टाक्यांमध्ये आत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. मात्र पाऊस झाल्याने सध्या पाणी तुडुंब भरलेलं होतं. त्यामुळे आत जाणे शक्य झाले नाही.


हा संपूर्ण परिसर वनविभागाच्या अख्त्यारीत येतो तसेंच येथे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आढळतो. नीलगायी, हरीण,रोही, साळीदर, कोल्हे, तरस, रानडुक्कर, विषारी बिनविषारी साप, विंचू आणि अधेमध्ये बिबट सुद्धा… त्यामुळे पावसाळा सोडला तर इतरवेळी सहसा इकडे कुणी फिरकत नाही. आणि तसंही या जागांची स्थानिकांना फार काही माहितीदेखील नाही.
डोंगराळ असूनही टाकीपर्यंत जाण्याची चढण सोपी आहे. फक्त एकटंदुकटं इकडे फिरकू नये. आणि खरोखर प्राचीन वास्तुंबद्दल, स्थळंबद्दल कुतूहल.. उत्सुकता असणाऱ्यांसाठीच हे ठिकाण आहे.. हेही लक्षात घ्यावं, उगाच पायपीट करू नये. शिवाय अशा ओसाड अथवा जंगली जागांवर फिरतांना तुम्हांस स्वतःच्या बचावाचे थोडेफार तरी तंत्र अवगत असावे. निसर्गसमोर आपली मस्ती आपल्या बॅगेत गुंडाळून ठेवावी. नतमस्तक राहावं. उगाच धाडस करू नये..🙏😊

– नमिताप्रशांत🌿