महाराष्ट्रात नवीन ७ प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस

संग्रहित छायाचित्र

आता शेगावसाठी धावणार वंदे भारत एक्सप्रेस

मुंबई  – देशभरातील लाखोंचे परम श्रध्दास्थान असलेले शेगावचे गजानन महाराज देवस्थान आहे. हे संस्थान आपल्या शिस्तबद्धता, स्वच्छतेबाबत, आलेल्या भक्तांच्या निवास व्यवस्थेबाबत विलक्षण अशी काळजी घेणारे संस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज लाखोंच्या संख्येने भाविक गजानन महाराजांच्या दर्शनाला येत असतात.शेगावला भेट देणाऱ्या तमाम भाविकांचा प्रवास आरामदायी आणि जलद करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.त्या संदर्भातील सूचनेचा प्रस्तावसुद्धा मध्य रेल्वेकडून मागवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय रेल्वे मंत्रालय या चालू वर्षात मे २०२४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या ३० ते ३५ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. तर नव्या वर्षात वंदे भारत गाड्यांद्वारे बहुतांश पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचता येईल. भारतातील सर्व धर्माची जवळपास सर्व प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे या ट्रेनच्या सेवेने जोडली गेल्यास यातून रेल्वेला मोठा महसूलही मिळणार आहे.भारतीय रेल्वेने सर्व झोनना पत्र पाठवून कोणत्या मार्गावर वंदे भारत चालविता येईल, यासंदर्भात सूचना मागितल्या होत्या.महाराष्ट्रात प्रस्तावित काही मार्ग आहेत, त्यातील मराठवाडा विभागतून  मुंबई ते जालना, ही नुकतीच सुरू झालेली गाडी आहे.

आता १ मुंबई -अहमदाबाद, २ पुणे -बेळगाव,३ पुणे -बडोदा,४ मुंबई एलटीटी-कोल्हापूर सह ५ पुणे ते सिकंदराबाद
६ मुंबई ते शेगाव,७ पुणे ते शेगाव, या रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाने चर्चा केली असून मुंबई ते शेगाव दरम्यान वंदे भारत ट्रेन चालविण्याचा विचार सुरू आहे.

रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास व धार्मिक तीर्थस्थळांना जोडणाऱ्या संकल्पनेत अमृत भारत योजने अंतर्गत भारतीय रेल्वेने देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा कायपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये परळी वैजनाथ, शेगाव रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे. त्यामुळे  गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला येणाऱ्या भाविकांना जलदगतीने व  आरामदायक प्रवास लाभणार आहे.