परळीची भूमिकन्या साकारणार अयोध्येत रांगोळी

बीड/परळी वैजनात/ एम एन सी न्यूज नेटवर्क दि.16 – मूळची परळीची असलेल्या कन्येला प्रभु श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापना उत्सवाच्या निमित्ताने सेवेची संधी मिळाली आहे.आसावरी रामलिंगआप्पा लिंगाडे ही परळीची भूमिकन्या रांगोळी काढण्यासाठी तिचे पुण्यातील शिक्षक व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला रवाना होणार आहे.बारा ज्योतिर्लिगांपैकी पाचवे जोतिर्लिंग असलेल्या परळीतल्या कन्येला रांगोळी काढण्यासाठी भेटलेले आमंत्रण हे अभिमानाची बाब मानली जात आहे.
आसावरी ही सध्या पुण्यात रांगोळीचे रितसर प्रशिक्षण घेत असून भव्य-दिव्य रांगोळी काढण्याची कला तीला आत्मसात आहे.यापूर्वी तीने प्रभु श्रीराम,विठ्ठलाच्या भव्य कलाकृती साकारल्या असून त्याची दखल वृत्तवाहिन्या, माध्यमांनीही घेतली आहे.वडील रामलिंग आप्पा परळीतील गणेशपार भागातील मूळ रहिवासी असून सध्या ते संगीत शिक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झाले आहेत. भाऊ तबलावादक असून तोही पुण्यात पूर्णवेळ तबल्याचे गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेत आहे.त्यांचे दोन्ही मुलं-मुली हे उत्तम कलाकार असून त्यांचा कलेचा वारसा पुढे चालवत आहेत.