“नानासाहेबांचा वाडा”

वास्तु/पुरातन वास्तु /वाडा /गढी/बांधकाम 

अकोला/पातूर- एम एन सी न्यूज नेटवर्क -के नमिता प्रशांत – दगड आणि विटांच्या बांधणीचा,अप्रतिम रचना असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे पातूर येथील हा नानासाहेबांचा वाडा. स्थानिक लोक “नानासाहेबांचे मंदिर” म्हणूनच संबोधतात. मुघलकालीन म्हणजेच सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा हा वाडा असून एखाद्या किल्ल्याप्रमाणे याला चार बाजूना चार बुरुज आणि सभोवार परकोट आहे. पाया काळ्या दगडातील असून संपूर्ण बांधकाम विटांमधील आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस नगारखानादेखील आहे. आत प्रवेश केल्यावर समोर परकोटाच्या मधोमध नानासाहेब व त्यांच्या सहचारिणी यांचे समाधी मंदिर असून मंदिराच्या आजूबाजूला व मागच्या बाजूस त्यांच्या शिष्यांच्या समाध्या आहेत.

मंदिर वा वाडा काहीही असो… मात्र आहे अगदी अप्रतिम बांधणीचा. विटांची रचना खुपच सुंदर आहे. फक्त वाईट याचंच वाटतंय, की अतिशय दुर्लक्षित असून मोडकळीस आलेली वास्तू आहे. मंदिराच्या चहूबाजूनी झाडांची मूळे हळूहळू स्वतःचं वर्चस्व गाजवू पहात आहेत.


पातूरला बोर्डी नदीचा आशिर्वाद लाभलाय. असं म्हणतात, की या नदीत पूर्वी लोकांना सोन्याची नाणी सापडत असे. या वाड्यात देखील एक भुयार आहे, तेथे अजूनही सोन्याच्या मोहरा आहेत असं म्हटल्या जातं मात्र कुणीही शोधण्याचा प्रयत्न केलेला नाहीये हे ऐकून समाधान वाटलं. असो, मंदिर वजा वाडा अतिशय अप्रतिम असून मागच्या बाजूस असलेल्या सोनाजी व होनाजी या शिष्यांच्या समाध्या मला विशेष आवडल्या आहेत.
– नमिताप्रशांत 🌿