
🔸विहीर, आड/बारव/पाणी टाक/ पुरातन ऐतिहासिक
🔷“कपूर बावडी”..
ता.रामटेक, जि. नागपूर. एम एन सी न्यूज नेटवर्क – के नमिता प्रशांत भारतातील प्रसिद्ध बावडींपैकी एक म्हणजे “कपूर बावडी”…नुकतंच पेंच अभयारण्य फिरून आलोत. परतीच्या प्रवासात आम्ही रामटेक आणि मनसर फिरलो, छान जागा आहेत ह्या फक्त ऊन जरा जास्त असल्यामुळे आमच्या बर्फीला थोडा त्रास झाला त्यामुळे आम्हालाही पुढे फिरण्यात रस राहिला नाही. मी यापूर्वीही ही स्थळे बघितलेली होती, पण तेव्हा आणि आत्ता बघण्यात बराच फरक पडला होता…कदाचित बदललेला दृष्टीकोण असावा.. असो…
रामटेकचं गडमंदिर बघितल्यावर आम्ही थेट कपूर बावडी गेलोत. घाई एवढी की काय सांगू. फोटो पाहून तुम्हांला कळेलच. बिचारी कधी कोसळेल सांगता येत नाही एव्हढी विदिर्ण अवस्था आहे. बरेचजण “कपूर बावडी” हिला करपूर बावडी देखील म्हणतात. पूर्वीपासून यातील पाण्याला कापुरासारखा सुगंध येत असल्याने हिला ‘कपूर’ बावडी नाव पडले. यातील पाणी औषधीगुणांनी युक्त आहे अशी मान्यता होती. अनेक आजार या नैसर्गिक स्रोताने बरे होऊ शकतात या मान्यतेमुळे ह्या बावडीला विशेष महत्व होते.
विदर्भात कलचुरी नावाचे राजे हाेऊन गेले. त्यांनीच कपूर बावडीची निर्मिती केली होती. त्यांच्याच नावावरून हे नाव पडले असेही म्हंटल्या जाते. माहितीनुसार कपूर बावडीमध्ये कपुरता, काली, चामुंडा, इंगलाज, रणचंडी या देवींचे मंदिर आहे. हल्ली सगळं खचलं असल्याने खाली तिथे कुणी जात नाही पण आम्ही महाशय धोका पतकरण्यात तरबेज आहोत. तसं नाही पण चैन पडत नाही. (असले प्रयोग करूच नयेत आणि केल्यास काळजीपूर्वक स्वबळावर करावेत. कुणी दुसरं करतंय म्हणून आपण करू नये 🙏
कपूर बावडी ही प्रसिद्ध जैन मंदिराच्या मागील बाजूस सुंदर अशा निसर्गाच्या कुशीत लपलेली आहे. या बावडीची निर्मिती ही १२०० वर्षांपूर्वीची असून हेमाडपंथी बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. या बावडीच्या कळसाचे दगड खचलेले आहेत. कधी धडधड कोसळतील सांगता येत नाही. आपण वारसा किती छान जतन करु शकतो, याचं हे अत्युत्तम उदाहरण आहे. बावडीला आत्ताही भरपूर पाणी आहे. यामधून निघणारे पाणी जमा करण्यासाठी एक तलाव बनविण्यात आला होता. जो अजूनही आहे. त्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा व मच्छीपालन केले जायचे. एवढी माहिती मी ऐकिवात होते.
पुढील माहिती मात्र गुगल भाऊंनी दिलेली आहे.👇
असं म्हणतात, की रामटेकमध्ये पूर्वी पानमळे माेठ्या प्रमाणात हाेते. त्याकरिता अनेक विहिरी बांधण्यात आल्या होत्या तर काही ठिकाणी बावड्याही बांधण्यात आल्या होत्या. तसेंच अनेक ठिकठिकाणी तलावांची निर्मितीही केली. रामटेकचे पान प्रसिद्ध असल्याने व मागणी जास्त असल्याने हा व्यवसाय भरभराटीस आला होता. बारई समाज हा व्यवसाय करायचा. पुढे नैसर्गिक संकटे आली. नवीन पिढीचे या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे विहिरी आणि बावड्यांकडे कुणीही लक्ष दिले नाही. रामटेक शहरात आजही १५ ते २०च्या आसपास विहिरी व बावड्या आहेत. यातील बहुतेक पुरातन विहिरी बुजल्या आहेत. काही बावड्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. रामटेकमध्ये कपूर बावडी, सिंदुर बावडी, कुमारीका बावडी, सीतेची नान्ही, रामाळेश्वर बावडी, रामतलाई बावडी यासह अनेक बावड्या अजूनही अस्तित्वात आहेत. कुमारीका बावडीमध्येही देवीचे मंदिर आहे.
असो, ही कधीही ढासळणारी अप्रतिम, दिलखेचक अशी प्राचीन वास्तू आहे. या बावडीचं तग धरून उभं राहणं आयुष्याला नक्कीच नवी दिशा देऊन जातं, यात शंका नाही… कारण जितकयांदा मी या खचलेल्या भारीभक्कम दगडांकडे बघितले,तितकयांदा तो एक दगड शोधत राहिले ज्याने महतप्रयासाने या कधीही कोलमडणाऱ्या असंख्य दगडांना पेलून धरलंय… कुरबुर न करता
– नमिताप्रशांत🌿

